पंढरीत वैष्णवांचा महासागर!

By admin | Published: July 4, 2017 05:16 AM2017-07-04T05:16:58+5:302017-07-04T05:16:58+5:30

जाहला भक्तीचा जागर।पंढरीत अवतरला वैष्णवांचा महासागर ।।या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त

Oceans of the Vaishnavite in the Pandhari! | पंढरीत वैष्णवांचा महासागर!

पंढरीत वैष्णवांचा महासागर!

Next

प्रभू पुजारी/लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) :
जाहला भक्तीचा जागर।
पंढरीत अवतरला
वैष्णवांचा महासागर ।।
या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर उसळल्याचे चित्र पंढरपुरात पाहायला मिळत आहे.
कपाळी चंदन, बुक्का व अष्टगंध़ांचा टिळा़़ गळा तुळशी माऴ़़ डोक्यावर तुळशी वृंदावऩ़़ भगव्या पताका़़़ मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजऱ़़ चेहऱ्यावर विठ्ठलाच्या भेटीची आस़़़ स्वागतासाठी ठिकठिकाणी घातलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्या़़़ आसमंतभर घुमणारा टाळ-मृदंग, वीणेचा नाद़़़ अन् बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय़़़’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह शेकडो पालख्या अन् दिंड्या सोमवारी पंढरीत दाखल झाल्या़
पंढरपूरजवळील वाखरी मुक्कामी असलेले पालखी सोहळे दुपारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले़ इसबावी, केबीपी कॉलेज, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँकेमार्गे पालखी सोहळे आपापल्या मठात जाऊन विसावले़ टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरीचा पालखी मार्ग दुमदुमून गेला आहे. पंढरपूर म्हणजे जणू भक्तीचा महासागर आणि वारी म्हणजे अनंत अडचणींवर मात करून या महासागराला येऊन मिळणारी भक्तगणांची नदी, याचे प्रत्यंतर येत आहे.
तुज पाहता सामोरी
दृष्टी न फिरे माघारी ।
माझे चित्त तुझे पाया
मिठी पडली पंढरीराया ।।
या उक्तीप्रमाणे लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांना कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन घेईन असे झाले आहे़ चंद्रभागेकाठी पाहायला मिळतोय तो अपार श्रद्धेचा आणि नि:स्वार्थ प्रेमाचा महासंगम! चंद्रभागेत पवित्र स्नान करून भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ होत आहेत़ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनरांगेतील भाविकांना जागेवरच मोफत चहा, स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था केली आहे़

पददर्शनास २५ तासांपेक्षा जास्त वेळ

पददर्शन रांग ही सोमवारी दुपारी १२ वाजताच गोपाळपूरच्या पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत पोहोचली होती़ मंदिरापासून ही रांग १० किलोमीटरपर्यंत गेली होती़ त्यामुळे आता पददर्शनासाठी किमान २५ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे़ प्रदीप काजगुंडे (परभणी) हे रविवारी पहाटे ६ वाजता रांगेत उभे होते. ते सोमवारी सकाळी ७ वाजता दर्शन घेऊन बाहेर पडले. पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झालो असून, सर्वकाही मिळाल्याचे ते आनंदाने सांगत होते़

वारीचे विभाजन
पंढरीत भाविकांचा महासागर लोटल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दर्शनरांगेत २ लाख, ६५ एकर परिसरात दीड लाख, मठ, मंदिर, धर्मशाळा या ठिकाणी २ लाख, सर्व पालख्यांसोबत आलेले वारकरी व शहरातील विविध चौक, रस्त्यांवर, मोकळ्या जागेत तंबू उभारून राहिलेले २ लाख आणि रस्त्यावरून ये-जा करणारे १ लाख असे एकूण आठ लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत आहेत़
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची पहाटे महापूजा करणार आहेत.
आज नगरप्रदक्षिणा
सर्व संतांच्या पालख्यांसह विविध दिंड्यांतील वारकरी चंद्रभागेत स्नान करून, टाळ-मृदंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यानंतर अनेक वारकरी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात.

Web Title: Oceans of the Vaishnavite in the Pandhari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.