पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 07:02 AM2024-10-19T07:02:42+5:302024-10-19T07:02:42+5:30

तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने नाराज झालेले नेते विरोधी पक्षांची कास धरत आहेत. 

October heat of party change BJP's Rajan Teli, Suresh Bankar, Ajit Pawar Group's Deepak Aba Salunkhe in Uddhav Sena | पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत

पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच तिकिटासाठी पक्षबदलाचा ऑक्टोबर हिट सुरू झाला आहे. ज्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळेल, तिकडे जाण्याचा कल वाढल्याचे यातून दिसून येत आहे. त्यादृष्टीने काही नेत्यांनी इतर पक्षांच्या प्रमुखांची भेट घेण्याचा सपाटाही लावला आहे. तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने नाराज झालेले नेते विरोधी पक्षांची कास धरत आहेत. 

सिंधुदुर्गातील भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे विश्वासू असलेले राजन तेली, भाजपाचेच सिल्लोड मतदारसंघातील प्रदेश चिटणीस सुरेश बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूर येथील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. अजित पवार गटातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर गेलेले अभिजित पाटील, एकेकाळचे शरद पवारांचे समर्थक आणि नंतर भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेही मुलासाठी शुक्रवारी पवारांना भेटले. तसेच पिंपरी-चिंचवडमधून इच्छुक असलेले विलास लांडे, शिंदेसेनेचे आमदार किशोर दराडे पुतण्याच्या उमेदवारीसाठी पवारांना भेटल्याचे समजते.

अँजिओग्राफीनंतर उद्धव ठाकरे रणधुमाळीत उतरले
अँजिओग्राफीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. पहिल्याच दिवशी तीन महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश करत त्यांनी महायुतीला धक्का दिला आहे. अद्याप मी उमेदवार जाहीर केलेले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेशावेळी स्पष्ट केले असले, तरी या तिघांना उमेदवारी देण्याचे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत.

राजन तेली
राजन तेली हे नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मी शिवसेना सोडून मोठी चूक केली होती. मी शिवसेना सोडली नसती तर दीपक केसरकर यांचा राजकीय जन्म झालाच नसता, असे तेली म्हणाले. त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून शिदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येऊ शकते.

सुरेश बनकर
सिल्लोडमधील भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्या रूपाने मंत्री अब्दुल सत्तार यांना आता आव्हान मिळेल. जुलूमशाही हा सिल्लोड मतदारसंघाला लागलेला कलंक पुसण्याची संधी मिळाली, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दीपक आबा साळुंखे -
अजित पवार गटाचे सोलापूरचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी उद्धवसेनेची मशाल हाती घेतली. सांगोल्याचा माझा आधीचा आमदार गद्दार झाला तरी सांगोलेकर सोबत आहेत हे दाखवून द्यायचे आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

शरद पवारांना भेटू, तिकिटाचे बोलू -
सतीश चव्हाण
हे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. लवकरच शरद पवार गटाकडून त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाने त्यांना पक्षातून निलंबित केले. लक्ष्मण ढोबळे : यांना आपल्या
मुलासाठी मोहळ मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी असल्याचे समजते.

पुतणी उभी राहणार काकांविरोधात
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिगणे यांनीही शरद पवारांची भेट घेतली. मी पक्ष सोडलेला नाही, पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी आपण शरद पवारांकडे केल्याचे गायत्री यांनी सांगितले. अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.


 

Web Title: October heat of party change BJP's Rajan Teli, Suresh Bankar, Ajit Pawar Group's Deepak Aba Salunkhe in Uddhav Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.