आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार

By admin | Published: June 10, 2015 02:09 AM2015-06-10T02:09:52+5:302015-06-10T02:09:52+5:30

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.

October to March will stop | आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार

आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार

Next

संतोष मिठारी, कोल्हापूर
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. शिवाय त्यांना अनुत्तीर्ण विषय सोडविण्यासाठी करावी लागणारी आॅक्टोबर-मार्चची वारी थांबणार आहे.
इयत्ता दहावी, बारावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर फेरपरीक्षेचा हा पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान बारावी आणि दहावीची परीक्षा घेतली जाते. तिचा निकाल मे-जूनमध्ये जाहीर केला जातो. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर ते आॅक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर केला जातो. यात बारावीचा विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरी त्याला पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जूनची प्रतीक्षा करावी लागते.
दहावीसाठी गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण मंडळाने पदवी शिक्षणाप्रमाणे ‘एटीकेटी’ची सुविधा सुरू केली आहे. यात विद्यार्थी एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला तरी संबंधिताला अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळतो. बारावीत जाण्यापूर्वी आॅक्टोबर आणि मार्चच्या परीक्षेत दहावीचे राहिलेले विषय सोडविणे बंधनकारक आहे. त्याचा चांगला परिणाम झाला आहे.
गेल्या पाच वर्षांतील निकाल पाहता, दहावी आणि बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी सरासरी १० ते १२ टक्के आहे. आता शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची मेमध्ये फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा अधिकतर बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण, त्यांना ‘एटीकेटी’ची सुविधा नाही. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणार आहे. शिवाय, उच्च शिक्षणातील प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार आहे.
-------------
दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ची सुविधा देण्यात येत आहे. मात्र, बारावीसाठी अशी सुविधा नाही. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाते. शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार फेरपरीक्षेचा पर्याय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. - गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Web Title: October to March will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.