ओडिसाच्या ‘त्या’ पतीला घाटंजीचा ‘दिलासा’
By Admin | Published: August 27, 2016 06:37 PM2016-08-27T18:37:30+5:302016-08-27T18:37:30+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील मधुकर धस नावाच्या व्यक्तीने ओडिसामधील माझी यांना मदत पाठवली आहे
>खांद्यावर नेला पत्नीचा मृतदेह : रोजगार, शिक्षण अन् तेरवीसाठी पाठविले पैसे
अविनाश साबापुरे / ऑनलाइन लोकमत -
यवतमाळ, दि. 27 - टीव्हीवर जगभरातल्या बातम्या पाहणे हा अनेकांचा शौक. एखादी हृदयद्रावक घटना बघून सारेच हळहळतात. पण बातमीतल्या वंचित माणसाच्या मदतीसाठी धावून जाण्याची माणूसकी फार थोडे लोक दाखवतात. अशी मोजकीच पण ‘दिलासा’दायक माणसे यवतमाळ जिल्ह्यातही आहेत. त्याचीच ही कहाणी...
एक माणूस आपल्या पत्नीचा मृतदेह अक्षरश: खांद्यावर घेऊन निघाला. रुग्णालयाने अँबूलन्स नाकारल्यामुळे त्याला पत्नीचे कलेवर तब्बल ६० किलोमीटर खांद्यावर वाहून न्यावे लागले. त्याच्या सोबत त्याची बारा वर्षांची मुलगीही पायपीट करीत गेली. २५ ऑगस्टच्या रात्री हे दृश्य देशभराने टीव्हीवर पाहिले. सोशल मीडियावर पसरविले. मग बेसुमार हळहळ व्यक्त केली. ओरिसामधील भुवनेश्वर जिल्ह्याच्या प्रशासनावर दोषारोपही सुरू झाले. पण या वंचित, उपेक्षित माणसासाठी आपण काही करायला हवे, असा विचार कुणाच्याच मनात नाही आला. कालाहंडी गावात पोहोचलेल्या दाना मांझी या अभागी माणसाने कसाबसा पत्नीचा अंत्यविधी आटोपला. माध्यमे आणि सरकार बातमी दाखवू आणि पाहून गप्प बसले.
...पण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील मधुकर धस नावाच्या व्यक्तीने मात्र बातमी पाहताच एक निर्णय घेतला. होईल तेवढी मदत द्यायची. दिलासा सामाजिक संस्था चालविणाºया मधुकर धस यांनी तातडीने ५० हजारांची व्यवस्था केली. हे पैसे घेऊन त्यांनी संजय जवंजाळ या आपल्या सहकाºयाला शनिवारी सकाळीच ओडिसाकडे रवाना केले. रविवारी सकाळी जवंजाळ कालीहंडी गावात पोहोचून दाना मांझी यांचे घर गाठणार आहेत. या आदिवासी कुटुंबाला रोजगाराचे साधन म्हणून ‘दिलासा’तर्फे त्यांना काही शेळ्या खरेदी करून देण्यात येणार आहेत. तर दाना मांझी यांच्या बारा वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या नावाने काही रक्कम ‘फिक्स डिपॉझिट’ करण्यात येणार आहे. तर मृत अमंग यांच्या तेरवीचा खर्चही देण्यात येणार असल्याची माहिती मधुकर धस यांनी ‘लोकमत’ला दिली.
महाराष्ट्रातल्या घाटंजी सारख्या गावातील माणसाने ओरिसामधील एका गरीबासाठी पाठविलेली ही मदत अनेकांसाठी ‘दिलासा’दायक ठरली आहे. घाटंजी लगतच्या आर्णी तालुक्यात शेलूच्या मुधळकर या शेतकरी परिवारात पिता-पुत्राने आत्महत्या केली. त्यांच्यासाठीही पाच हजारांचे धान्य आणि २० हजारांचा धनादेश ‘दिलासा’तर्फे पाठविण्यात आला आहे.
‘‘दाना मांझीची बातमी टीव्हीवर पाहिली. नंतर रात्रभर मला झोपच नाही लागली. माणसाने माणसांसाठी धावून गेलेच पाहिजे, मग तो कुठलाही असो. ‘दिलासा’ला विविध प्रोजेक्ट राबविताना शासनाकडून मिळालेल्या मानधनातूनच ही मदत दिली जात आहे.’’
- मधुकर धस, दिलासा सामाजिक संस्था, घाटंजी