ओडिसाच्या ‘त्या’ पतीला यवतमाळमधून मदतीचा हात
By admin | Published: August 29, 2016 06:24 AM2016-08-29T06:24:49+5:302016-08-29T06:24:49+5:30
ओरिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यात रुग्णालयाने अॅम्बुलन्स नाकारल्यामुळे पत्नीचे कलेवर खांद्यावर घेऊन एक व्यक्तीने तब्बल ६० किलोमीटर पायपीट केली.
अविनाश साबापुरे, यवतमाळ
ओरिसामधील भुवनेश्वर जिल्ह्यात रुग्णालयाने अॅम्बुलन्स नाकारल्यामुळे पत्नीचे कलेवर खांद्यावर घेऊन एक व्यक्तीने तब्बल ६० किलोमीटर पायपीट केली. सोबत त्याची बारा वर्षांची मुलगीही होती. गुरुवारी रात्री हे दृश्य अख्ख्या देशाने टीव्हीवर पाहिले. सोशल मीडियावरही त्याची चर्चा झाली. ...पण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील मधुकर धस नावाच्या व्यक्तीने मात्र बातमी पाहताच एक निर्णय घेतला अन् त्या व्यक्तीसाठी मदतीचा हात पुढे केला.
कालाहंडी गावात पोहोचलेल्या दाना मांझी या अभागी माणसाने कसाबसा पत्नीचा अंत्यविधी आटोपला. ते पाहून दिलासा सामाजिक संस्था चालविणाऱ्या मधुकर धस यांनी तातडीने ५० हजारांची व्यवस्था केली. हे पैसे घेऊन त्यांनी संजय जवंजाळ या आपल्या सहकाऱ्याला शनिवारी सकाळीच ओडिसाकडे रवाना केले. रविवारी सकाळी तो दाना मांझी यांचे घर गाठणार आहेत. या आदिवासी कुटुंबाला रोजगाराचे साधन म्हणून ‘दिलासा’तर्फे काही शेळ्या खरेदी करून देण्यात येणार आहेत. तर दाना मांझी यांच्या बारा वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या नावाने काही रक्कम ‘फिक्स डिपॉझिट’ करण्यात येणार आहे. तर मृत अमंग यांच्या तेराव्याचा खर्चही देण्यात येणार असल्याची माहिती मधुकर धस यांनी ‘लोकमत’ला दिली. महाराष्ट्रातल्या घाटंजी सारख्या गावातील माणसाने ओरिसामधील एका गरीबासाठी पाठविलेली ही मदत अनेकांसाठी ‘दिलासा’दायक ठरली आहे.