शिवाजीराव निलंगेकरांविरोधात गुन्हा
By admin | Published: March 9, 2017 01:52 AM2017-03-09T01:52:57+5:302017-03-09T01:52:57+5:30
मराठवाडा मित्र मंडळाला देय असलेल्या ५ कोटी ६० लाख १ हजार २६० रुपये आणि ३ लाख ६९ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याच्या
मुंबई : मराठवाडा मित्र मंडळाला देय असलेल्या ५ कोटी ६० लाख १ हजार २६० रुपये आणि ३ लाख ६९ हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याच्या आरोपाखाली माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी निलंगेकर यांच्यासह मे. समृद्धी आर्केड प्रा.लि., मे. अगरवाल कन्स्ट्रक्शन कंपनी आणि कंपनीच्या भागीदारांविरोधातही २८ फेब्रुवारीला गुन्हा नोंद झाला आहे. मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पाटील म्हणाले की, मंडळाने शासनाकडून खेरवाडी परिसरातील चेतना महाविद्यालयासमोरील एक जागा नाममात्र दराने घेतलेली होती. त्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमबीए महाविद्यालय आणि वसतिगृह तयार करण्याचा मानस होता. त्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून मंडळास अधिक चटई क्षेत्र दिले. मात्र त्रिपक्षीय करार करताना मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष निलंगेकर यांनी कार्यकारिणीला अंधारात ठेवून व्यवहार केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. यामुळे मंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. परिणामी, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)