वक्फ बोर्ड साहित्य खरेदी घोटाळाप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 12:32 AM2016-02-25T00:32:09+5:302016-02-25T00:32:09+5:30
महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी बुधवारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि त्याच्या स्वीय सहायकाविरुद्ध छावणी
औरंगाबाद : महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी बुधवारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि त्याच्या स्वीय सहायकाविरुद्ध छावणी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९९ लाख ६ हजार ९१५ रुपयांचा हा खरेदी घोटाळा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एन.डी. पठाण आणि त्यांचे स्वीय सहायक इफ्तेखारउल्ला सईदउल्ला बेग अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत छावणी पोलिसांनी सांगितले की, वक्फ बोर्डाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वक्फ बोर्डाला शासनाकडून अनुदान मिळते. त्या अनुदानातून साहित्य खरेदी करण्यात आली. मात्र, त्यात गैरव्यवहार झाला असून वक्फ बोर्डाची फसवणूक झालेली आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पंचनामा करण्यात आला, तेव्हा भांडार कक्षात कोणतेही साहित्य सापडले नाही. संगणक, प्रिंटर, यूपीएस, फोटो कॉफियर मशीन, फ्रँकिंग मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)