मोदींबाबत आक्षेपार्ह विधान, CM शिंदे तातडीनं उठले अन् झापलं; मिटकरींनी व्यक्त केली दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 03:34 PM2022-12-27T15:34:36+5:302022-12-27T15:36:20+5:30
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं.
नागपूर-
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलंच सुनावलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आणि मिटकरींना संसदीय संस्कृतीची आठवण करुन दिली.
पंढरपूर कॉरिडोअरच्या मुद्द्यावर विषय मांडताना अमोल मिटकरी यांनी मोदींचा रावण असा उल्लेख केला होता. त्यावर तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. "देशाच्या पंतप्रधानांचा आदर राखणं हे एक नागरिक आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे. पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असतात त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना आपण तारतम्य बागळलं पाहिजे", अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना सुनावलं.
अजित पवारांनी सांगितली ठरावातील चूक, शिंदे-फडणवीस सरकारकडे दाखवलं बोट
अमोल मिटकरींच्या विधानावरुन विधान परिषदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत अमोल मिटकरी यांनी केलेलं विधान पटलावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अमोल मिटकरी यांच्या माफीनाम्याची मागणी केली. देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलताना विचारपू्र्वक बोललं पाहिजे अशी भावना निलम गोऱ्हे यांनीही व्यक्त केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली.