एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल, अंजली दमानियांविरोधात केले होते आक्षेपार्ह वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 07:13 PM2017-09-07T19:13:21+5:302017-09-07T19:48:48+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई, दि. 7 - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसे यांनी जळगावमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना दमानिया यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती.
२ सप्टेंबर रोजी खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, राजेंद्र फडके आदींची मुख्य उपस्थिती होती. या जाहीर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना खडसे म्हणाले होते की, माझ्या शेतातील उत्पन्नाबाबत काही वेळेस प्रश्न उपस्थित होतात. परंतु मला सांगायचे आहे की, माझ्या शेतातील आंबे आता मोठे झाले आहेत. कदाचित दमानियांच्या शेतातील आंबे लहानच असतील. खडसेंच्या या वक्तव्यावर दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.
एकनाथ खडसेंनी माझ्याबद्दल जी भाषा वापरली त्यामुळे मी प्रचंड व्यथित झाले आहे. खडसेंविरोधात मी तिस-यांदा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहे. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, मी थेट कोर्टात जाईन असे दमानिया यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी जळगाव आणि मुंबईतील पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. अखेर बऱ्याच पाठपुराव्यानंतर खडसेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दमानिया यांनी सांगितले.
मात्र, दमानिया यांनी केलेले आरोप खडसेंनी फेटाळून लावले होते. माझे शेतीपासूनचे उत्पन्न वाढले. आंब्याची झाडे, त्यांचा आकार वाढला. तसेच दमानियांच्या शेतातील उत्पन्नही वाढले असेल, असे मी बोललो. यात एक महिला म्हणून त्यांना हिणवण्याचा वा त्यांच्याविषयी अश्लील बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले होते.