निधी देण्याचा प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: May 19, 2016 02:15 AM2016-05-19T02:15:59+5:302016-05-19T02:15:59+5:30
लोणावळा ते पुणेदरम्यान नवीन ट्रॅक टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३९२ कोटी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला
पुणे : लोणावळा ते पुणेदरम्यान नवीन ट्रॅक टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३९२ कोटी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. मात्र, हा ट्रॅक टाकण्यासाठी पालिकेने का निधी द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून स्थायी समितीच्या सदस्यांनी मंगळवारी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
पुणे ते लोणावळा मार्गावर प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन ट्रॅक टाकण्याचा निर्णय पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत घेण्यात आला आहे. या नवीन ट्रॅकसाठी २ हजार ३०६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य शासन करणार असून उर्वरित खर्च पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या संयुक्त विद्यमाने करण्यात यावे, असे ठरले होते. त्यानुसार पुणे महापालिकेला ३९२ कोटी रुपये द्यावे, असा निर्णय घेण्यात आला होता.
महापालिका प्रशासनाने त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीसमोर सादर केला होता. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी महापालिकेने का पैसे द्यावेत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. शहरातील सर्व निवासी व व्यावसायिक मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करून त्यानुसार मिळकत कर वसुली करण्यासाठी सार आयटी रिसोर्सेस या कंपनीसमवेत जवळपास २३ कोटींचा करार करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.
महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे तब्बल ८.२ लाख मिळकतीची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा खूप अधिक मिळकती शहरात आहेत, त्यांची नोंद झाली नसल्यामुळे पालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न बुडते. (प्रतिनिधी)