सिद्धिविनायकाच्या भक्तांना ‘वन-वे ट्रॅफिक’चा प्रसाद

By admin | Published: July 11, 2017 05:17 AM2017-07-11T05:17:36+5:302017-07-11T05:17:36+5:30

मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात येणारी भाविकांची संख्या लक्षणीय आहे.

Offer of One-Way Traffic to the devotees of Siddhi Vinayak | सिद्धिविनायकाच्या भक्तांना ‘वन-वे ट्रॅफिक’चा प्रसाद

सिद्धिविनायकाच्या भक्तांना ‘वन-वे ट्रॅफिक’चा प्रसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात येणारी भाविकांची संख्या लक्षणीय आहे. परिणामी, दादर स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर या मार्गावर मोठी वाहतूककोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा मार्ग वन-वे करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांच्या या उपायाला स्थानिकांनी मात्र विरोध दर्शविला आहे.
मंगळवारी आणि अंगारकी, संकष्टीच्या वेळी रात्रीपासून श्रींच्या दर्शनासाठी रांग लागते. परिणामी, दादर स्थानकापासून मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी असल्याचे दिसून येते. सिद्धिविनायक मंदिर ‘हिट-लिस्ट’वर असल्याने पोलिसांचादेखील येथे खडा पहारा असतो. शिवाय बेस्ट बस मार्ग, खासगी वातानुकूलित टॅक्सी, शेअर टॅक्सीं पार्किंगमुळे वाहतूककोंडीत भर पडते. सद्य:स्थितीत ‘सिद्धीविनायक मंदिर ते पोर्तुगीज चर्च’ यादरम्यानचा एस.के. बोले मार्ग दुतर्फा आहे. ही व्यवस्था बदलून मंदिर ते पोर्तुगीज चर्चदरम्यान वन-वे करण्याची तयारी वाहतूक पोलिसांनी केली आहे. यामुळे दादर पश्चिमेकडून येणाऱ्या वाहनांना पोर्तुगीज चर्चला उजवीकडे वळून अथवा परळ एसटी डेपोकडून गोखले रोडवरून शिवसेना भवनाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पोर्तुगीज चर्चच्या सिग्नलला डावीकडे वळून सिद्धिविनायक मंदिराकडे जाता येणार नाही. मात्र या बदलामुळे मंदिर परिसरातील स्थानिकांना वळसा घालावा लागणार असल्याने त्यांनी या बदलाला तीव्र विरोध केला आहे.
वाहतुकीच्या बदलांमुळे प्रवासी कोंडी सोडवता येईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर परिसरात सेना नेत्यांनी या निर्णयाला पाठिंबाही दिला नाही आणि विरोधही दर्शविला नाही. मात्र मनसे नेत्यांनी स्थानिकांच्या तक्रारींची दाखल घेत वन-वेला विरोध केला आहे.
>सिद्धिविनायक मंदिर ते दादर स्थानक या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यामुळे वाहनांना तब्बल २०-२५ मिनिटे खोळंबून राहावे लागते. ही वाहतूककोंडी सोडवण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. प्रवाशांच्या सोईसाठी ७ दिवस प्रयोगात्मक म्हणून हा मार्ग वन-वे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांसह, स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादानंतर हा मार्ग कायमस्वरूपी असा ठेवायचा की नाही, यावर निर्णय घेण्यात येईल.
- अमितेश कुमार, सह आयुक्त, वाहतूक पोलीस

Web Title: Offer of One-Way Traffic to the devotees of Siddhi Vinayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.