जानाईदेवीला ग्रामस्थांकडून चांदीची पालखी अर्पण
By admin | Published: February 28, 2017 01:43 AM2017-02-28T01:43:14+5:302017-02-28T01:43:14+5:30
श्री जानाईदेवीच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे पंधरा किलोची चांदीची पालखी तयार करून ही पालखी जानाईदेवीला अर्पण केली
जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीची ग्रामदेवता श्री जानाईदेवीच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे पंधरा किलोची चांदीची पालखी तयार करून ही पालखी जानाईदेवीला अर्पण केली आहे. जानाईदेवीचे मानकरी नागनाथ झगडे यांच्याकडे ही पालखी सुपूर्द करण्यात आली आहे. ग्रामदेवता जानाईदेवी हे जेजुरीकर व खंडोबा भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानाईदेवीचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकने येथील डोंगरदऱ्यांच्या व निसर्गाच्या सान्निध्यात आहे.
देवीचे भक्त नागू माळी यांनी फार पूर्वी जेजुरी ते निवकने जानाईदेवीचा पायी पालखी सोहळा सुरूकेला. या सोहळ्याला जेजुरीकर ग्रामस्थांनी मोठे स्वरूप प्राप्त केले आहे. जानाईदेवीच्या पालखी सोहळ्यासाठी जेजुरीकर ग्रामस्थ व भाविकांनी सुमारे पंधरा किलो चांदीचा वापर करून सुबक अशी पालखी तयार केली आहे. या पालखीसाठी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पाच किलो चांदी, तसेच देवीचे मानकरी नागनाथ झगडे यांनी अडीच किलो चांदी तसेच अनेक भक्तांनी चांदी दिली आहे. (वार्ताहर)
या नवीन चांदीच्या पालखीचे जेजुरी येथील प्राचीन लवथळेश्वर मंदिरात विधिवत पूजन तसेच देवीची आरती करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने गुलाल उधळून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवीचे मानकरी नागनाथ झगडे यांच्याकडे ही पालखी सुपूर्द करण्यात आली. दि. २८ फेब्रुवारीपासून जेजुरी ते निवकने जणांनी देवी पालखी सोहळ्याला प्रारंभ होत आहे.