आॅनलाइन दस्तनोंदणीसाठी पुण्यात कार्यालय

By admin | Published: July 30, 2015 03:16 AM2015-07-30T03:16:15+5:302015-07-30T03:16:15+5:30

मुंबई, पुणे, ठाणे शहरांतील नागरिकांना जलदगतीने आॅनलाईन दस्तनोंदणी करता यावी यासाठी पुण्यात ई-रजिस्ट्रेशनचे स्वतंत्र कार्यालयच सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

Office for online documenting in Pune | आॅनलाइन दस्तनोंदणीसाठी पुण्यात कार्यालय

आॅनलाइन दस्तनोंदणीसाठी पुण्यात कार्यालय

Next

पुणे : मुंबई, पुणे, ठाणे शहरांतील नागरिकांना जलदगतीने आॅनलाईन दस्तनोंदणी करता यावी यासाठी पुण्यात ई-रजिस्ट्रेशनचे स्वतंत्र कार्यालयच सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या अर्धा तासात भाडेकरार नोंदविता येईल. मालमत्तांची खरेदी- विक्री अथवा भाडेकरारांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करावी लागते. राज्यात ४६४ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षाला आठ हजारहून अधिक दस्तांची नोंद होत असल्यास तेथे नवीन कार्यालयाची निर्मिती करण्याचा विचार केला जातो. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांवरील भार कमी व्हावा यासाठी भाडेकरारासारखे दस्त आॅनलाईन नोंदविण्याची सुविधा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली दुय्यम निबंधक कार्यालयेच या आॅनलाईन दस्तांची नोंदणी करुन नागरिकांना आॅनलाईन पावती व बायोमेट्रिक स्वाक्षरी देतात.
पुणे, मुंबई व ठाणे शहरातील दुय्यम निबंधकांना त्यांचे काम सांभाळून आॅनलाईन दस्तांची नोंदणी करणे जिकरीचे होते. त्यामुळे ई-रजिस्ट्रेशनसाठी पुण्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी २४ पदे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते व सहायक नोंदणी महानिरीक्षक संतोष हिंगाणे यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेलाही झोपडपट्टी क्षेत्रात विविध करार करावे लागतात. हे सगळे दस्त आॅनलाईन नोंदविले जातील. ‘एमआयडीसी’तील भाडेपट्टेही आॅनलाईन नोंदविण्याची सुविधा सुरू होईल. (प्रतिनिधी)

मुद्रांक विभागाने पुणे, मुंबईतील २५ बिल्डरांना त्यांच्याकडील सदनिका (फ्लॅट) खरेदीचे व्यवहार आॅनलाईन करण्यास परवानगी दिली आहे. ज्या बिल्डरकडे दोनशेहून अधिक सदनिका विक्रीस असतात त्यांना ई-रजिस्ट्रेशनचा परवाना दिला जातो. संबंधित बिल्डर दुय्यम निबंधकांना आॅनलाईन दस्त सादर करु शकतात. ‘म्हाडा’लाही आता ई-रजिस्ट्रेशनचा परवाना दिला जाणार आहे. - डॉ. एन. रामास्वामी, नोंदणी महानिरीक्षक

Web Title: Office for online documenting in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.