अधिकाऱ्यांनी फसविले मुख्यमंत्र्यांना !
By admin | Published: September 5, 2015 01:35 AM2015-09-05T01:35:27+5:302015-09-05T01:35:27+5:30
दुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना
अण्णासाहेब नवथर, अहमदनगर
दुष्काळ पाहणीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाथर्डी तालुक्यातील सातवडला पोचला....गावात एकही टँकर नाही, हे ऐकताच मुख्यमंत्री भारावून गेले. कारण काय तर गावातील आदर्श जलमीटर योजना! मुख्यमंत्र्यांचे भारावलेपण अधिकच वाढले. त्यांनी तत्काळ घोषणा केली की ‘या योजनेचा आदर्श राज्यातील गावांनी घ्यावा!’ हीच आदर्श योजना मुख्यमंत्री गेल्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत ‘उघडी’ पडली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चक्क कोरड्या उद्भवावरील बंद पडलेली, गंजलेली योजना आदर्श म्हणून दाखवत चक्क मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक केल्याचे समोर आले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील दुसरा टप्पा पाथर्डी तालुक्यात होता. मुख्यमंत्री सातवड गावाच्या शिवारात शिरल्यापासून, या गावाने दुष्काळावर कशी मात केली याची घोकंपट्टी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुरु झाली होती. गावकुसावर असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून ताफा गावात शिरला़ शिवराम वाघ यांच्या पॉलिहाऊसची पाहणी झाली़ त्यानंतर हा ताफा गावातील जलमीटरची पाहणी करण्यासाठी निघाला़ अनिता वाघ यांच्या घरासमोरील नळाला बसविलेले मीटर पाहताच मुख्यमंत्री खूश झाले. तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी ओरडले, ‘सांगा काय फायदा झाला?’ त्यावर ‘जलमीटरमुळे पाणीपट्टी ४० वरून ३० रुपये झाली़ पाण्याचीही मोठी बचत झाली़ पूर्वी ४०० लीटर पाणी घेत होतो़ मीटर बसविल्यापासून ३५० लीटरच पाणी घेतो़ मीटरचा चांगला फायदा झाला.’ असे भडाभडा त्या महिलेने सांगून टाकले. यामुळे मुख्यमंत्री अधिकच भारावले. त्यांनी तातडीने ‘सातवड गावाचा आदर्श राज्याने घ्यावा’, अशी घोषणाच करून टाकली. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे वेगळीच कुजबुज सुरू होती. गावाला वर्षापासून पाणी नाही याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. पण ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलीच नाही. बंद पडलेल्या योजनेवर मीटर बसवून आदर्श योजनेचा खटाटोप गावकऱ्यांच्या बोलण्यातून समोर आला. ‘लोकमत’ने त्यानंतर रीतसर ही योजनाच तपासली. तेव्हा हा बनाव पूर्णपणे समोर आला. गावपुढाऱ्यांच्या मदतीने अधिकाऱ्यांनी चक्क राज्याच्याच मुख्यमंत्र्यांना फसविण्याचा प्रकार घडला. मुळात ज्या विहिरीवर ही योजना आहे, ती विहीर वर्षभरापासून बंद आहे. उपसा करणारी योजनाही गंज लागून बंद पडली आहे. ही योजना दशकभर जुनी आहे. सध्या गाव तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. त्यासाठी प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव पाठविले आहेत, पण ते मंजूरच केले जात नाहीत, अशी तक्रारवजा माहिती प्रशासनातीलच एकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.