वेळकाढू अधिकाऱ्यांची आयुक्तांकडून हजेरी
By admin | Published: May 2, 2015 01:38 AM2015-05-02T01:38:25+5:302015-05-02T01:38:25+5:30
नागरी समस्या सोडविण्यात पालिका अकार्यक्षम असल्याचा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनने काढल्याची गंभीर दखल खुद्द नवनियुक्त आयुक्त अजोय मेहता
मुंबई : नागरी समस्या सोडविण्यात पालिका अकार्यक्षम असल्याचा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनने काढल्याची गंभीर दखल खुद्द नवनियुक्त आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली आहे़ त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी त्यांची हजेरीच मेहता घेणार आहेत़
नागरी तक्रारींची दखल घेण्यासाठी पालिका किमान १७ दिवसांचा कालावधी घेत असल्याचा ठपका प्रजा या संस्थेने एका पाहणीतून ठेवला आहे़ त्यामुळे दूषित पाणी, कचऱ्याची समस्या वाढली असून पुढील दोन वर्षांमध्ये सहा वॉर्डांत ही समस्या पेटणार असल्याचे भाकीतही या संस्थेतर्फे करण्यात आले आहे़ ही बाब पालिकेसाठी लाजिरवाणी असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार पालिकेच्या नियमित कामकाजाचा आढावा ते घेत असल्याचे सुत्रांकडून समजते़
मेहता यांनी पहिल्या दिवशी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला़ पालिका व अन्य प्राधिकरणांमधील असमन्वयाचा फटका प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना बसत असल्याचा आरोप होतो़ त्यामुळे या पहिल्याच बैठकीत आयुक्तांनी सर्व प्राधिकरणांची झाडाझडती घेतली़ पाणी तुंबणे, खड्डे, धोकादायक इमारती, साथीचे आजार आणि
कचरा या पाच मुद्दे देऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत़ (प्रतिनिधी)