अधिकारी आत्महत्येबाबत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 01:57 AM2017-02-27T01:57:57+5:302017-02-27T01:57:57+5:30
आत्महत्येप्रकरणी पी. व्ही. पेवेकर आणि राजशेखर सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
डोंबिवली : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ठाण्याच्या कामगार राज्य विमा निगममध्ये सहाय्यक पदावर काम करणाऱ्या अशोक पवार (५८) यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पी. व्ही. पेवेकर आणि राजशेखर सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
पवार यांनी २१ जानेवारीला राहत्या घरी आत्महत्या केली. त्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी वरिष्ठ अधिकारी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले होते. चौकशीअंती महिनाभरानंतर या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पवार मानसिक तणावाखाली होते. ते मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी ५ डिसेंबरला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. त्रासाबाबत त्यांनी तक्रार केली, परंतु तिची योग्य दखल न घेतल्याने पवारांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीत पेवेकर आणि राजशेखर सिंग यांचा उल्लेख होता. पवार यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून विष्णुनगर पोलिसांनी शनिवारी पेवेकर आणि सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)