आरबीआयचे अधिकारीच सुटीवर!
By admin | Published: November 14, 2016 05:24 AM2016-11-14T05:24:54+5:302016-11-14T05:21:11+5:30
केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी,रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. मात्र, रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या
पुणे: केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी,रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. मात्र, रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) अधिका-यांनी सुट्टी घेतली,त्यामुळेच बँकांपर्यंत पैसे पोहचले नाहीत,असा आरोप ‘आॅल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’चे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांंनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर देशातील सर्व नागरिक आणि बँक कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका दाखवत बँकांचे व्यवहार सुरू केले. बँक कर्मचा-यांनी तर सुट्टी रद्द करून शनिवारी व रविवारी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम केले. नागरिकांनी संयम दाखवत निमुटपणे बँकांच्यासमोर रांगा लावल्या. मात्र,आरबीआयकडून बँकांकडे रक्कम न आल्याने ती नागरिकांना देता आली नाही. त्यामुळे संपूर्ण देश कामाला लागलेला असताना आरबीआयच्या अधिका-यांनी बँकांकडे रक्कम पाठवली नाही,असा आरोप उटगी यांनी केला. या प्रकाराची चौकाशी करून संबंधितांवर कारवाई करावी,असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)