अनधिकृत पार्किंगमुळे ‘अधिकृत’ वाहतूक कोंडी
By admin | Published: September 24, 2016 01:28 AM2016-09-24T01:28:13+5:302016-09-24T01:28:13+5:30
हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला.
वाकड : आयटीनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडीतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला. मात्र, या प्रकल्पाच्या बसगाड्यांना अधिकृत वाहनतळ नसल्याने ह्या बसगाड्या कुठेही अस्ताव्यस्त व अनधिकृतपणे उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हिंजवडी उपनगरामध्ये आयटी कंपन्यांचे जाळे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ अशा भागांमधून कामगार येत असतात. येथील रस्त्यांवरून दररोज अगणित वाहनांची ये-जा असते. त्यामुळे हिंजवडी परिसरात वाहतूककोंडी ही जटिल समस्या बनली आहे. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून औद्योगिक विकास महामंडळ आणि एचआयए यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो जीप ग्रीन आणि डिलाइट असा प्रकल्प हिंजवडीत राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या ताफ्यात नुकतीच शंभरावी बसदेखील सामील झाली आहे. या प्रकल्पाद्वारे हजारो आयटी अभियंत्यांचा विनाअडथळा ये-जा करण्याचा प्रश्न तूर्तास काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ह्या बसगाड्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहेत. हिंजवडी फेज तीनसह आयटीनगरीच्या अन्य रस्त्यांवर ह्या बस वाहनचालक अस्ताव्यस्त उभ्या करत आहेत.
हिंजवडी फेज तीन येथील मेगा पोलीस सर्कलला पीएममीचा थांबा आहे. मात्र, या थांब्यावर पीएमपीऐवजी मेट्रो जीपच्या बसगाड्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा होतो. ह्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
आयटी पार्कमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते प्रशस्त झाले. मात्र, ह्या रस्त्यांचा सुमारे ४० टक्के भाग वाहनांच्या अनधिकृत पार्किं गनेच व्यापलेला असतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मुळशी शिवसेनेने आवाज उठविला असून, लवकरात लवकर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिवसेंदिवस आयटीनगरीत वाहनांच्या संख्या वाढत असताना पार्किंगची सोय नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
>आयटी अभियंत्यांच्या सुविधेसाठी मेट्रो जीप हा प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळ नसल्याने त्या कुठे उभ्या कराव्यात, असा प्रश्न आहे. यावर आम्ही अभ्यास करीत आहोत. एमआयडीसीकडे आम्ही जागेची मागणी केली. त्यांनी एक जागादेखील सुचविली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल.’’
- अनिल पटवर्धन, अध्यक्ष, एचआयए
अभियंत्यांच्या सुविधेसाठी की गैरसोयीसाठी ह्या बसेस सुरू केल्या आहेत, याचा विचार एमआयडीसी आणि एचआयएने करावा. मात्र, सोय थोडी आणि गैरसोय जास्त, अशी परिस्थिती ह्या बसेसमुळे आयटीत निर्माण झाली आहे. आयटी अभियंत्यांसह सर्वांनाच या अस्ताव्यस्त बसेसचा त्रास होत असून, यावर कायमचा तोडगा काढावा. अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन करू.’’
-मच्छिंद्र ओझरकर, पुणे जिल्हाध्यक्ष युवा सेना