अधिकाऱ्यांना खडसावले
By admin | Published: June 11, 2015 01:17 AM2015-06-11T01:17:02+5:302015-06-11T01:17:02+5:30
राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत
मुंबई : राजकीय नेते, कारखानदारांचं चांगभलं करण्यासाठी यापुढे जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार चालणार नाही. शेतकऱ्यांचे भले करणारेच निर्णय झाले पाहिजेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य बँक, जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
शेतकऱ्यांच्या कर्जाची फेररचना करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ते बोलत
होते. कर्जाची फेररचना करताना शेतकऱ्यांचे कर्ज कायम राहते आणि जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते, हा वर्षानुवर्षांचा अनुभव
आहे. त्यामुळेच ही फेररचना पुन्हा एकदा बँकांच्या पथ्यावर पडता
कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी
बजावले.
नियमांवर बोट ठेवायचे आणि वर्षानुवर्षे चाललेले पठडीतील धोरण राबवून ‘लकीर के फकीर’ बनून काम करायचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. शेतकऱ्यांवरील कर्जाची फेररचना करताना जिल्हा बँका नव्या कर्जातून आधीचे कर्ज कापून घेतात. त्यामुळे बँकांना पैसा मिळतो, पण शेतकरी
पुन्हा कर्जबाजारीच राहतो. या पद्धतीच्या पलीकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही, असा
ठोस प्रस्ताव तयार करण्याचे
आदेश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. (विशेष प्रतिनिधी)