ऑफलाइन परीक्षा, हिंदुस्थानी भाऊ आणि ती मुलगी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:44 AM2022-02-06T11:44:33+5:302022-02-06T11:45:37+5:30

हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणून वादळ उठवून दिले. शिक्षणतज्ज्ञ संतप्त झाले. बाबूरावांना हे समजले. त्यांनी तत्काळ काही शिक्षणतज्ज्ञांना फोन केले. अन्...

Offline exam, Hindustani bhau and that girl | ऑफलाइन परीक्षा, हिंदुस्थानी भाऊ आणि ती मुलगी...!

ऑफलाइन परीक्षा, हिंदुस्थानी भाऊ आणि ती मुलगी...!

googlenewsNext

अतुल कुलकर्णी -

कोरोनानंतर सगळ्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीने परीक्षा ऑनलाइन घ्या म्हणून वादळ उठवून दिले. शिक्षणतज्ज्ञ संतप्त झाले. बाबूरावांना हे समजले. त्यांनी तत्काळ काही शिक्षणतज्ज्ञांना फोन केले. तेव्हा चिडलेल्या तज्ज्ञांनी त्यांना कॉलेजमध्ये मुलांसोबत बोलण्याचे निमंत्रण दिले. बाबूराव कॉलेजच्या दिशेने निघाले. एका कॉलेजच्या दारातच त्यांना चकचकीत गाड्यांमधून, हातात स्लीक मोबाईल घेऊन किणकिणत येणाऱ्या पोरा-पोरींचे दर्शन झाले. ते पाहून देश प्रगती करतोय, यावर त्यांचा विश्वास बसला. परीक्षा ऑफलाइन होणार, म्हणून काही चॅनलचे रिपोर्टरही तेथे पोहोचले. त्यांच्यातील संवाद ऐकायला बाबूराव तेथेच उभे राहिले. चॅनलवाली विचारत होती आणि मुलं उत्तरं देत होती...

- तुमचे शिक्षण घरुनच सुरू होते. आता तू कॉलेजला आली आहेस... परीक्षादेखील ऑफलाइन होणार आहेत... काय प्रतिक्रिया आहे तुझी? 
- हिंदुस्थानी भाऊ आमच्यासाठी भांडत होता ते बरे होते. ऑनलाइन शिकत असताना व्हिडीओ ऑफ करुन ओटीटीवर सिनेमे बघता यायचे. आतादेखील ऑनलाइन परीक्षा असती तर कोणीही प्रश्नपत्रिका सोडवली असती. पण आता ते नाही करता येणार... 
- काय बघायचीस ओटीटीवर तू....? सिनेमे की अभ्यासाचे व्हिडीओज...?
- अरे, ओटीटीवर कुठे असतात अभ्यासाचे व्हिडीओज. तेथे फक्त मज्जा बघायची...
- अरे पण आई-वडील काही म्हणायचे नाहीत का...?
- त्यांना आमच्या रुममध्ये ‘नो एंट्री’ असते ना... तुम्ही असे काकू टाईप प्रश्न नका विचारु. ते विचारायचे असतील तर आम्ही नाही बोलणार...
- बरं ते जाऊ दे... अधून मधून कधी देशभक्तीचे सिनेमे पाहिले की नाही...?
- पाहिले ना... उरी पाहिला मी.... काय क्यूट दिसत होता ना विकी कौशल... उगाच नाही कटरिनाने त्याला गटवला...
- अरे, पण तू देशभक्तीचे सिनेमे पाहात होतीस की भलतेच काही बघत होतीस... ते जाऊ दे. तू कॉलेजमध्ये कोणता विषय शिकतेस...
- मी हिस्ट्री विषय घेतला आहे. सोप्पा असतो ना तो...
- मग तुला इतिहासातील महापुरुषांबद्दल काही सांगता येईल का..?
- म्हणजे कोणाबद्दल विचारायचं आहे तुम्हाला...? तुम्ही काही नावं सांगा बरं...
- अरे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे यांच्याबद्दल काय सांगशील?
- हे पहा, मला परेश रावल आवडतो... एकदम भारी दिसतो ना तो... सो क्यूट ना... 
पण परेश रावलचा काय संबंध इथे... 
- (प्रश्नार्थक चेहऱ्याने) तुम्हाला माहिती नाही, ‘सरदार’ नावाच्या चित्रपटात परेश रावलनी काम केलंय. त्यात त्याची भूमिका चांगलीच होती आणि महात्मा गांधी बघावा तर रिचर्ड ॲटनबरोचाच... तसा गांधी होणे नाही... मंगल पांडे तर अमीर खाननेच करावा... क्यूटेस्ट होता तो...
- चॅनलवाल्या मुलीने थरथरत पुन्हा विचारले, आपल्या मराठीतल्या तानाजी मालुसरेंचे योगदान तरी माहिती आहे का तुला... तू इतिहास शिकतेस ना...
- माहिती कसे नाही... अजय देवगणने केला होता ना तानाजी.... पण अमीर खान भारी होता बरं का...
ती सगळी चर्चा ऐकून बाबूरावांना चक्कर येणे बाकी होते. उगाच नाही शिक्षणतज्ज्ञ संतापले यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी हिंमत करुन त्या मुलीला विचारले, ‘बाई गं, तुझं अगाध ज्ञान मी ऐकतोय मघापासून... तू इतिहास विषय सोडून दे... त्यापेक्षा सिनेमाचा नीट अभ्यास कर... त्यात तरी तुझं करियर होईल. तो हिंदुस्थानी भाऊ तुला आयुष्यभर पुरणार नाही. तू केलेला अभ्यासच तुझ्या कामी येणार आहे.’ 
त्यावर बाबूरावांकडे रागीट नजरेने पाहात 
ती मुलगी ताडताड करत निघून गेली... 
तर चॅनलवाल्या मुलीने लगेच 
बाबूरावांच्या तोंडापुढे माईक नेऊन प्रश्न केलाच...
- तुम्हाला हिंदुस्थानी भाऊचा स्टॅन्ड आवडला की शिक्षणमंत्र्यांनी केलेली घोषणा आवडली...
तुमचाच,
बाबूराव
 

Web Title: Offline exam, Hindustani bhau and that girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.