अरे, उमेदवारच सापडेना !
By admin | Published: January 19, 2017 03:14 AM2017-01-19T03:14:59+5:302017-01-19T03:14:59+5:30
राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते.
पूजा दामले,
मुंबई- राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते. आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता नाही म्हणून मिरवणाऱ्या राजकीय पक्षांसमोरही आता महिला उमेदवार शोधण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. कारण नव्या आरक्षण सोडतीत चर्नीरोड पूर्वेकडील ‘सी’ वार्डातील प्रभाग २२२ हा इतर मागासवर्गीय महिला झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात कोणता चेहरा मतदारांसमोर आणायचा यावरून राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये २१८ प्रभागात येणारा काही भाग आता प्रभाग २२२मध्ये गेला आहे. त्यामुळे या विभागात सर्वच पक्षांना आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. गेल्या वेळेस खुला असणारा हा प्रभाग आता इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाला आहे. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि नव्याने पडलेले आरक्षण यामुळे आगामी निवडणुकीत कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा? हा यक्षप्रश्न सर्व पक्षांना पडला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे.
शिवसेनेकडे संभाव्य उमेदवार म्हणून महिला पदाधिकारी,
माजी नगरसेविका आहेत; पण अजूनही शिवसेनेकडून कोणत्या उमेदवाराला उभे करायचे याविषयी विचार सुरू आहेत. माजी नगरसेविकेबरोबर अजून एका
महिला उमेदवाराचे नाव सध्या चर्चेत आहे; पण नक्की कोणत्या महिलेला कौल मिळेल याचे कोडे अद्याप सुटले नाही.
काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) या पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या महिला नातेवाइकांची वर्णी लागावी म्हणून लगबग सुरू आहे. भाजपामधूनही दोन ते तीन नावांची चर्चा सुरू आहे;
पण एका महिला उमेदवारावर आमदाराचा वरदहस्त असल्याने त्या महिलेची वर्णी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसकडून
तीन, तर सेवा दलातून एक महिला उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची
बहीण, पत्नी यांची नावे चर्चेत आहेत, तर मनसेकडून एका कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
>नव्या चेहऱ्याला नकार
या प्रभागात मराठी आणि गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे उमेदवार निवड प्रक्रिया अधिकच क्लिष्ट होत चालली आहे.
अनेक निकष लावताना जनसंपर्क किती? या निकषाचा विचार करणेही अपरिहार्य असल्याने राजकीय पक्षांची तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे नवीन महिला चेहरा आणण्यासाठी राजकीय पक्षांची तयारी दिसत नाही.