अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:11 AM2020-08-15T00:11:01+5:302020-08-15T00:11:38+5:30
अख्खे जग कोरोना नावाच्या संकटाचा सामना करत आहे़ हा लढा सर्वांसाठीच नवीन आहे़ तरीही प्रत्येक जण आपापल्या परीने या युद्धाला सामोरा जात आहे.
अख्खे जग कोरोना नावाच्या संकटाचा सामना करत आहे़ हा लढा सर्वांसाठीच नवीन आहे़ तरीही प्रत्येक जण आपापल्या परीने या युद्धाला सामोरा जात आहे. यामध्ये आपली माणसे गमावल्याचे दु:ख, आर्थिक चणचण, आधाराची गरज, अबालवृद्धांची काळजी, असे अनेक विषय आहेत़ यामुळे येणारे नैराश्य, मानसिक खच्चीकरण, मनोधैर्य विचलित झालेल्या समाजमनाला सावरायला काय करता येईल? तुम्ही अडचणींवर मात कशी केली? स्वत:ला कसे सावरले? आपल्या आजूबाजूच्यांना काय सांगाल..? मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया.
नावीन्यपूर्ण उपक्रम शोधावेत!
लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर बंधन आले, हे खरे. प्रत्यक्ष भेटीगाठी होत नाहीत. मात्र, आॅनलाइनच्या माध्यमातून माणसे मोठ्या प्रमाणात एकमेकांना भेटत आहेत. कामानिमित्त म्हणा, कार्यक्रमानिमित्त म्हणा किंवा केवळ गप्पा मारण्यासाठी म्हणा; पण माणसे एकमेकांना भेटत आहेत. चर्चा, संवाद कुठेही थांबलेला नाही. आॅनलाइनद्वारे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत आणि हे सर्व पाहता माणसाला नैराश्य किंवा एकटेपणा येता कामा नये. कोरोनाचे हे संकट केव्हा तरी संपायला हवे आणि ते लवकरच संपेल, अशी आपण आशा करू या. तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या मनाला पटतील, असे नावीन्यपूर्ण उपक्रम शोधावेत. त्यात मन गुंतवावे. लॉकडाऊनदरम्यान माझे काम तर पूर्वीपेक्षा अधिक वाढले. कामानिमित्तचा प्रवासाचा वेळ वाचला. त्या वेळेचा सदुपयोग करता आला. फोन, इंटरनेटच्या माध्यमातून जास्त मीटिंग घेता आल्या.
- डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ
कोरोना आजारामुळे नव्हे तर त्याच्या भीतीनेच रुग्ण धास्तावत आहे. त्यामुळे समाज मनातील ही भीती घालविण्याची गरज आहे. त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची सकारात्मकता देण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विभाग पातळीवरही पालिका कर्मचारी, नगरसेवक, कार्यकर्ते प्रत्येक जण झटत होते. या विषाणूला मात दिल्यानंतर मुंबईकर पुन्हा नव्या ताकदीने उभा राहील.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते
निसर्गाचा आदर करा; कोरोना दूर जाईल!
कोरोना या आजाराचा जन्म लालची भावनेतून झाला आहे. एका देशाला जगभरात आर्थिकदृष्ट्या आपले साम्राज्य उभे करायचे आहे. नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे त्यांनी हा विषाणू तयार केला की, हा विषाणू बाजारातून आला, हे मी सांगू शकत नाही. जरी हा विषाणू बाजारातून आला असला, तरी त्यामागे लालची भावना आहे. लॅबमध्ये तयार झाला असला, तरी त्यामागे हीच भावना आहे. त्यामुळे महामारीला तोंड द्यावे लागते आहे. मात्र, दुसऱ्यांना त्रास देताना स्वत:लाही त्रास होतो हे कदाचित तो देश विसरला असेल. कोरोनापासून वाचायचे असेल, तर पृथ्वी, पाणी आणि निसर्ग यांचा आदर केला पाहिजे. लोभापासून दूर राहिले पाहिजे. लोभमुक्त जीवन जगले पाहिजे. असे जीवन भयमुक्त असते. असे जीवन आनंददायी असते. म्हणून लोकांनी अर्थकारणाच्या लोभापासून दूर राहिले पाहिजे. निसर्ग प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकतो. मात्र, लोभ, लालसा, लालच पूर्ण करू शकत नाही. अशा स्वभावाचा इतरांना त्रास होतो. असाच त्रास जगाला आता होत आहे. ‘लोभमुक्त जीवन’ हेच आनंददायी जीवन आहे.
- डॉ. राजेंद्र सिंह, जलपुरुष
शारीरिक-मानसिकदृष्ट्या कार्यक्षम राहा
मुंबईतील कोविडची स्थिती मी स्वत: सुरुवातीपासून हाताळत आहे, त्यामुळे या परिस्थितीचे चांगले-वाईट परिणाम दिसून येत आहेत. या काळात डॉक्टरांनी सकारात्मक राहणे हे सर्वांत आव्हानात्मक आहे. यासाठी मी कायमच ध्यानधारणा, पुस्तक वाचन, गाणी ऐकणे या वेगळ्या गोष्टी अंगी बाळगल्या. यामुळे मला ताण-तणावाच्या चढउतारातून बाहेर येण्यास मदत झाली. सामान्यांनीही लॉकडाऊनच्या काळात शारीरिक - मानसिकदृष्ट्या कार्यक्षम असले पाहिजे, जेणेकरून आपोआप मनोवस्थेत ऊर्जा निर्माण होते. शिवाय, नैराश्य-हतबल वा नकारात्मकतेच्या भावना दूर सरतात. घरात राहणे थोडा काळ चांगले वाटू शकते, पण त्याचबरोबर काही दिवसांनी हे कंटाळवाणे आणि बंदिस्त असल्यासारखेही वाटू शकते. अशा स्थितीत सकारात्मक आणि आनंदी राहण्याचे हे काही मार्ग आहेत. शारीरिकदृष्ट्या कार्यरत राहा. तुम्हाला सुदृढ ठेवणारे घरगुती व्यायाम करा. त्याचप्रमाणे, आपल्या मनावर परिणाम करू शकणाºया खळबळजनक बातम्या आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणाºया पोस्टसकडे दुर्लक्ष करा. खात्री न करता कुठलीच बातमी आणि माहिती पसरवू नका.
- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालय
नवीन स्क्रिप्ट लिहिल्या, वाचन केले
लॉकडाऊनमुळे बरीच प्रत्यक्ष कामे थांबलीत, पण स्वत:साठी वेळ देता आला. प्रत्यक्ष शूटचे काम करता आले नाही, पण नवनवीन स्क्रिप्ट लिहिल्या. वाचन करून मनाला गुंतवून ठेवले. मुळात क्रिएटिव्ह माणसांना कधी थांबणे माहीत नसते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये निराश न होता, काहीतरी नवनवीन शिकले पाहिजे. आपली आवड असेल, त्या क्षेत्रात नवीन प्रयोग केले पाहिजेत. मुळात या परिस्थितीला सामोरे जाणारे आपण एकटेच नाही, सर्वांचीच जवळपास अशीच स्थिती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तरीही नैराश्य आले, काही सुचत नसले किंवा काही चांगले जरी घडले, तरी आपल्या आईवडिलांना, भावंडांना, मित्रमैत्रिणींना फोन, मेसेज करून सांगा. त्यांच्याशी बिनधास्त चर्चा करा. यापूर्वी कधीही झाला नसेल, इतका चांगला उपयोग या काळात व्हिडीओ कॉल, मेसेजचा झाला.
- विजू माने,
निर्माता-दिग्दर्शक
पर्यावरण अन् आरोग्य जपा!
कोरोना महामारीचे संकट, हे अभूतपूर्व होते. जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा निश्चितच घाबरलो होतो. यामध्ये वय आणि हृदयरु ग्ण हे दोन्हीही घटक असल्याने जास्त काळजी घेतली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम कटाक्षाने पाळले. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेच घरी असल्याने सुरुवातीला गैरसोय झाली. या दिवसांत मोबाइलचे आणि इंटरनेट तंत्रज्ञान शिकलो. एकटेपणा घालविण्यासाठी रोज कमीतकमी पाच आप्तेष्टांना फोन करून गप्पा मारत होतो. झूम मीटिंगवर शाळेचे काम आणि संवाद होऊ शकत होता. त्यामुळे बिझी राहू शकत होतो. बाकी नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास, वाचन आणि लिखाण चालूच होते. महामारीचे संकट आज आहे, ते उद्या जाईल, पण यातून आपण जे शिकलो, ते विसरू नका. एक म्हणजे, निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी घ्या. दुसरे शिस्त, स्वच्छता आणि स्वत:चे आरोग्य सदैव जपा.
- सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ