तेल गेले तूपही गेले... हाती आले धुपाटणे
By admin | Published: March 7, 2017 03:18 AM2017-03-07T03:18:29+5:302017-03-07T03:18:29+5:30
ठाण्यातही सत्तेसोबत राहूनही पदे न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने पक्षाची अवस्था तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे, अशी झाली
ठाणे : ठाण्यात तब्बल २५ वर्षांनंतर स्वबळावर लढणाऱ्या भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने आणि पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत मुंबईप्रमाणे ठाण्यातही सत्तेसोबत राहूनही पदे न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने पक्षाची अवस्था तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे, अशी झाली आहे. पालिकेत सत्ता येईल किंवा सत्तेतील वाटा मिळेल, या अपेक्षेने इतर पक्षांतून भाजपात उडी घेतलेल्यांची या भूमिकेमुळे घालमेल सुरू झाली आहे.
मुंबईइतका ठाण्यात भाजपाने पारदर्शकतेचा मुद्दा तापवला नव्हता. त्यात ठाण्यात शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्याने सत्तेसाठी भाजपाची तशी आवश्यकता नाही. मात्र, तरीही मुंबईतून पदे न स्वीकारण्याचा आदेश आल्याने पक्षाची कोंडी झाली आहे.
२५ वर्षे युतीत असताना संख्याबळ कमी असूनही भाजपाला स्थायी समिती, उपमहापौरपद, परिवहन आदींसह इतर महत्त्वाची पदे उपभोगण्यास मिळाली होती. सध्याच्या भूमिकेमुळे पुढील पाच वर्षे त्यांना यातील कोणतीही पदे उपभोगता येणार नाहीत. त्यामुळे पद किंवा सत्तेच्या लालसेपोटी इतर पक्ष सोडून भाजपात आलेल्या आणि पालिकेतील महत्त्वाच्या पदाचे आमिष दाखवून पक्षात घेतलेल्या नगरसेवकांनी, काही पदाधिकाऱ्यांनी आता पक्षांतर्गत दबावतंत्राचा वापर करून त्या जोरावर काही पदे मिळवण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती पुढे येत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत २५ वर्षांची युती तुटली, तरी सत्तेसाठी नंतर एकत्र यावे लागेल, असा विचार करून भाजपाने इतर पक्षांतील अनेकांना गळाला लावले. आपण ३५ पर्यंत मजल मारू आणि शिवसेनेला आपल्या मदतीखेरीज सत्ता स्थापन करता येणार नाही, असा त्यांचा होरा होता. पण, मतदारांनी त्यांच्या आशेवर पाणी फिरवले. केवळ २३ जागांवर मजल मारता आली. त्यानंतरही सत्तेत सहभागी होण्यासाठी स्थानिक मंडळी आतुर होती. परंतु, शिवसेनेसोबत कोणतेही पद न उपभोगण्याचा आणि विकासासाठी तसेच पारदर्शक कारभारासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा मुंबईचा निर्णय घोषित झाला. अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदांतील युतीचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. मात्र, तोच फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातही लागू केल्याने भाजपावासी होत निवडून आलेल्यांची सत्तेत सहभागी होण्याची स्वप्ने भंगली. भ्रमनिरास झाला. इतर पक्षांतून घेताना अनेकांना भाजपाने परिवहन समिती, स्थायी समिती, शिक्षण समिती, स्वीकृत सदस्य आदींसह इतर महत्त्वाच्या समित्या देण्याचे आश्वासन दिले होते. बंडखोरांनाही अशी आश्वासने दिली होती. परंतु, आता मुंबईप्रमाणेच ठाण्यातही भाजपाला सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही भाजपाचे नगरसेवक ठाण्याच्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देतील, अशी माहिती भाजपाच्या नेत्यांनी दिली. विकासाविरोधात जर काही निर्णय घेतले जात असतील, तर प्रसंगी विरोधकाची भूमिकाही घेतली जाईल, असेही भाजपा नेते सांगत आहेत. या भूमिकेमुळे तरी शिवसेनेकडून सरळ नाही, तर हात वाकडा करून काही पदे मिळवण्यासाठी येत्या काही काळात भाजपा आक्रमक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
>शिवसेनेपुढे दुहेरी आव्हान
एकहाती सत्ता संपादित करणाऱ्या शिवसेनेला यापूर्वी केवळ लोकशाही आघाडीचेच आव्हान होते. आता त्यांचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपाचेही त्यांना आव्हान असेल. भाजपाने जी भूमिका घेतली आहे, तीच भूमिका राष्ट्रवादीनेही घेतली असून विकासासाठी साथ आणि विकासाच्या विरोधात भूमिका घेतली गेली, तर त्याला विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच आता शिवसेनेला येत्या काळात दोन्ही पक्षांचा विरोध सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही आमचे नगरसेवक त्याच पद्धतीने काम करतील. विकासासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. परंतु, चुकीचे निर्णय घेतले जात असतील, तर त्याला आम्ही विरोध करू.
- संदीप लेले, शहराध्यक्ष, भाजपा
राष्ट्रवादीची भूमिका नेहमी विकासासाठी होती. आजही आमची तीच भूमिका आहे. परंतु, जर चुकीचे निर्णय होत असतील, तर मात्र आम्ही त्याला विरोध करणारच.
- हणमंत जगदाळे,
गटनेते, राष्ट्रवादी
भाजपाने ज्या पद्धतीने पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करून पाठिंबा दिला आहे, तशीच पारदर्शकता आम्हाला केवळ ठाणे, मुंबईपुरती अपेक्षित नाही. सगळ्याच ठिकाणी अपेक्षित आहे. आम्हीही जशाच तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत.
- दिलीप बारटक्के, गटनेते, शिवसेना
>महापौर झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी घोडबंदरच्या मानपाडासारख्या झोपडपट्टी परिसरातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असले, तरी सुरुवातीपासून त्यांचा कल समाजसेवेचाच होता. याला त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची साथ लाभली. ते सुरुवातीपासूनच शिवसेनेत होते. त्यामुळे आपसूकच मीनाक्षी यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलतानाही तीन टर्म त्या सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. अन्य नगरसेविकांशी तुलना करता मीनाक्षी शिंदे या स्वयंभू नगरसेविका आहेत. आक्र मक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. १५ वर्षांत याचा वेळोवेळी अनुभव प्रशासनाने घेतला. अन्याय झाला, तेव्हा त्यांनी स्वत:च्या सत्ताधारी पक्षालाही खडे बोल सुनावले. मानपाडा स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत त्यांनी केलेले आक्रमक भाषण अनेकांच्या स्मरणात आहे.
>रमाकांत मढवी यांचे नाव २००७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीवेळी पुढे आले. दिव्यात अनधिकृत बांधकामांचे पेव सुरू असताना आणि या गावातील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घेतलेली भूमिका. यातूनच ते चर्चेत आले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा उभा केला. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१२ मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तरीही त्यांनी नव्या उमेदीने आपल्या प्रभागासाठीच नाही, तर संपूर्ण दिव्यासाठी काम सुरूच ठेवले. दिव्यातून यंदा प्रथमच ११ नगरसेवक निवडून जाणार होते. या वेळी दिव्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांना दिव्यात आणले. पण त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. मढवी यांनी आपलीच जागा निवडून न आणता कामाच्या बळावर ८ जागा निवडून आणल्या. त्याचीच पोचपावती त्यांना उपमहापौरपदातून मिळाली.