‘हॉर्न ओके प्लीज’वर अखेर फुली!
By admin | Published: May 2, 2015 02:07 AM2015-05-02T02:07:24+5:302015-05-02T02:07:24+5:30
वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिण्यास मनाई करत परिवहन विभागाने सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुध्द ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘एचबीकेबी’
मुंबई : वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिण्यास मनाई करत परिवहन विभागाने सार्वजनिक व संवेदनशील ठिकाणी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरुध्द ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘एचबीकेबी’ (हॉर्न बजाने की बिमारी) मोहिमेवर शिक्कामोर्तब केले.
रुग्णालय, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालयांचा परिसर आणि नागरी वस्त्या अशा ठिकाणी अथवा रस्त्यांवरसुद्धा विनाकारण कर्णकर्कश्श हॉर्न वाजविण्याचा प्रघात वाढत आहे. त्यातून ध्वनिप्रदूषणाबरोबरच अनेकांना कर्णबधिरतेची बाधा होत आहे. निष्कारण हॉर्न वाजविण्याच्या प्रकाराविरुध्द लोकमत वृत्तपत्र समूहाने ‘एचबीकेबी’
नावाने विशेष जनजागृती मोहिम राबविली होती. या मोहिमेची दखल घेत प्राण्यांचे आवाज, भेसूर आणि कर्कश्श हॉर्नच्या विरोधात परिवहन विभागाने व्यापक मोहिम उघडली होती. आता त्यापुढे आणखी एक पाऊल परिवहन विभागाने उचलले असून वाहनांच्या पाठिमागे ‘हॉर्न ओके प्लीस’ असा संदेश लिहिण्यास मनाई केली आहे.
‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहिलेली वाहने पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना हॉर्न वाजविण्यासाठी विनाकारण उद्युक्त करतात. शिवाय, शांतता क्षेत्राचा नियमही पायदळी तुडविला जातो, असे परिवहन विभागाने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)