ओला, उबरवर लवकरच बंधने
By admin | Published: July 23, 2016 05:00 AM2016-07-23T05:00:00+5:302016-07-23T05:00:00+5:30
ओला, उबर या खासगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेवर काही बंधने लवकरच आणली जाणार आहेत
मुंबई : ओला, उबर या खासगी कंपन्यांच्या टॅक्सी सेवेवर काही बंधने लवकरच आणली जाणार आहेत. या बाबतचे धोरण निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयी लवकरच घोषणा करतील, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत सांगितले.
ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट रिक्षा परवाने देणाऱ्या रॅकेटसंदर्भात काँग्रेसचे नितेश राणे, भाजपाच्या सीमा हिरे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ओला, उबर या टॅक्सी सेवांमुळे वर्षानुवर्षे टॅक्सी चालवित असलेल्यांच्या पोटावर पाय दिला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. नॅशनल परमिट घेऊन या टॅक्सी केवळ मुंबई शहरात कशा काय धावतात असा सवाल त्यांनी केला. तेव्हा या टॅक्सींच्या या मुक्त संचारावर लवकरच बंधन घातले जाईल, इतरही काही नियम लागू केले जातील, असे रावते यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील बनावट रिक्षा परवान्यांसंदर्भात आरटीओतील कनिष्ठ लिपिक संतोष साकोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना निलंबितदेखील केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
>220 परवान्यांमध्ये अनियमितता आढळली असल्याचे रावते यांनी सांगितले. ज्या २२० जणांनी बनावट परवाने घेतले त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाचे आशिष शेलार यांनी केली. रावते यांनी ती मान्य केली.