जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्वीकारणार
By admin | Published: June 21, 2017 01:17 PM2017-06-21T13:17:13+5:302017-06-21T13:44:08+5:30
राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणाऱ्या जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजूरी दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21- राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणाऱ्या जुन्या 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजूरी दिली आहे. पोस्ट आणि जिल्हा बँकेतील जुन्या नोटा आरबीआय स्विकारणार आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार 30 जूनपर्यंत जिल्हा बँकांना त्यांच्याकडील जून्या नोटा आरबीआयमध्ये भरता येणार आहेत.
"नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांनी जिल्हा बँकेत भरलेल्या जुन्या नोटा आरबीआयने घ्यायला नकार दिल्यामुळे बँका अडचणीत आल्या होत्या.पण केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राने योग्य ती तपासणी करून हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात नागरीकांनी जिल्हा बँकेत भरलेल्या नोटा आरबीआय स्विकारणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरात दिली आहे. तसंच बँकेमध्ये पैसा नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं कुठून हा प्रश्न जिल्हा बँकांसमोर होता. तो प्रश्न आता सुटेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढला होता. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांमध्ये गेली सहा महिने पडून असलेले हजारो कोटी रुपयांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर होता. कोल्हापूर जिल्हा बँकेत तब्बल २७० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. रिझर्व्ह बँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेतला होता. नोटाबंदीनतर तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. राज्यभरातील जिल्हा बँकांना सुमारे साडेसहा हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या; पण या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने टाळाटाळ केली होती. या नोटाबाबत ‘नाबार्ड’ने दोनवेळा तपासणी केली तरीही रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्याच्या कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदी काळात जमा झालेल्या जुन्या नोटांच्या खात्यांची केवायसी तपासणीचे आदेश दिले. केवायसी पूर्तता असेल तर नोटा स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून तिसऱ्यांदा तपासणी केली. त्यामध्ये राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकांची १०० टक्के केवायसी पूर्तता झालेले निदर्शनास आले. त्यामुळे नोटा स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता पण तपासणी करून महिना उलटला तरी अद्याप नोटा स्वीकारण्यास काहीच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन हवालदिल झाले आहे. हजारो कोटींच्या नोटा सहा महिने पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना अडचणी येत आहेत. तोपर्यंत रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारणार नाहीच, असा फतवा काढल्याने जिल्हा बँकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत २७० कोटी रुपये पडून असल्याने बँकेला दरमहा ४७ कोटींचा फटका बसतो आहे.