जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटांची थप्पी
By admin | Published: May 15, 2017 12:38 AM2017-05-15T00:38:55+5:302017-05-15T00:38:55+5:30
सहा महिन्यांपासून पाच हजार कोटी पडून :दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सहा महिने उलटले तरी राज्यातील ३१ जिल्हा बॅँकांत अक्षरश: त्यांची थप्पी लागली आहे. बॅँकांमध्ये सुमारे ५००० कोटी रुपये पडून राहिल्याने त्याचा थेट परिणाम आर्थिक ताळेबंदावर झाला आहे. ‘नाबार्ड’ने तीनवेळा तपासणी करूनही रिझर्व्ह बॅँक नोटा स्वीकारण्यास तयार नसल्याने राज्यातील जिल्हा बॅँकांना दरमहा ४८ कोटी रुपये व्याजाचा फटका बसत आहे.
रिझर्व्ह बॅँकेने ८ नोव्हेंबरला ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. सुरुवातीला नोटा स्वीकारण्यास जिल्हा बॅँकांना परवानगी दिली होती. या काळात सुमारे ५००० कोटी रुपये जिल्हा बॅँकांत जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले. मात्र रिझर्व्ह बँकेने नवे चलन संबंधित बॅँकांना दिले नाही. बँकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ५०० व १००० रुपयांच्या नोटा आल्या कोठून, असा प्रश्न नाबार्ड व रिझर्व्ह बॅँकेने उपस्थित केला. त्यामुळे संबंधित खात्यांची ‘नाबार्ड’ने ‘केवायसी’ पूर्तता तपासली. काही ठिकाणी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी चौथी तपासणीही केली. तरीही या नोटा बॅँकांत पडून आहेत. मार्च २०१७ अखेर प्रत्येक जिल्हा बॅँकेला सरासरी १० ते १५ कोटींचा फटका बसल्याने ताळेबंद कोलमडला आहे. सर्व बॅँकांची ‘केवायसी’ तपासणी पूर्ण झाली आहे. आठ-दहा दिवसांत रिझर्व्ह बॅँक जुने चलन घेण्याची शक्यता आहे. सहा महिने झाले तरी चलन तुटवडा जिल्हा बॅँकांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. एकूण गरजेच्या पाच ते १० टक्के चलन पुरवठा रोज या बॅँकांना करन्सी चेस्टकडून होतो. त्यामुळे अद्यापही व्यवहार अडखळतच सुरू आहेत.
या चार बँकांत सर्वाधिक रक्कमनोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकांत ५०० व १००० रुपयांच्या सर्वाधिक नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झाल्या. नाशिक, सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बॅँकेतही मोठी रक्कम जमा झाली.
‘केवायसी’ची कागदपत्रे तपासणीने जीर्ण
‘केवायसी’च्या पूर्तता कागदपत्रांची जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा आणि ‘नाबार्ड’ने तब्बल तीन वेळा तपासणी केली. चार तपासण्यांमुळे ही कागदपत्रे जीर्ण होण्याची वेळ आली तरी रिझर्व्ह बॅँक व नाबार्डची खात्री झालेली दिसत नाही.
पाठपुरावा सुरूच : कर्नाड
याबाबत राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड म्हणाले, सहा महिने झाले राज्यातील जिल्हा बॅँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून सुमारे ५००० कोटी रुपये पडून आहेत. याबाबत शिखर बॅँक म्हणून आम्ही रिझर्व्ह बॅँकेकडे पत्रव्यवहार केला आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती केली आहे. शुक्रवारी सोळा जिल्हा बॅँकांच्या बैठकीतही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.