मुंबईतील जुन्या इमारतींचे आॅडिट करणार
By Admin | Published: May 12, 2015 01:50 AM2015-05-12T01:50:49+5:302015-05-12T01:50:49+5:30
काळबादेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबई : काळबादेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दोन अग्निशमन अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते ऐरोली येथे आले होते. या जखमींच्या उपचारात कसलीही कमतरता राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी काळबादेवी येथील गोकुळ निवास या इमारतीमधे आग लागलेली. यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत असतानाच इमारत कोसळलेली. त्यामध्ये संजय राणे, महेंद्र देसाई या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर सुनील नेसरीकर व सुधीर अमीन हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ऐरोलीच्या बर्न सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सोमवारी जवानांची भेट घेतली. दुर्घटनेत सुधीर हे ९० टक्के तर सुनील हे ५० टक्के भाजले आहेत. दोघांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास खबरदारीची उपाययोजना राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याकरिता जिथे मदत पोहचवता येणार नाही अशा दाटीवाटीच्या ठिकाणी मॉकड्रील घेऊन तिथल्या जुन्या इमारतींचे आॅडिट केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर दोन्ही जखमी अधिकाऱ्यांच्या उपचारात कसलीही कमतरता राहू देणार नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
बंदोबस्तावरील पोलिसांचे हाल
दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री किंवा गृहराज्यमंत्री येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. सकाळी ११पासून चोख बंदोबस्त होता. परंतु आगमनाची वेळ माहीत नसल्याने त्यांना पाच तास घाम गाळावा लागला. (प्रतिनिधी)