ठाण्यात जुन्या नोटा जप्त
By admin | Published: March 25, 2017 02:50 AM2017-03-25T02:50:30+5:302017-03-25T02:50:30+5:30
भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ३३ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या.
ठाणे : भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या ३३ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी आयकर विभागामार्फत सुरू आहे.
घोडबंदर रोडवरील जी कॉर्प गेटसमोर शुक्रवारी काही जण जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३३ लाख ५० हजार रुपयांच्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या.
महिन्याभरात दोन कोटी जप्त-
वागळे इस्टेट परिमंडळांतर्गत असलेल्या वर्तकनगर, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गेल्या महिन्याभरात तीन कारवायांमध्ये २ कोटी १ लाख ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये वर्तकनगर पोलिसांनी १ कोटी ३५ लाख ९६ हजार, चितळसर पोलिसांनी ३१ लाख ९८ हजार, तर कासारवडवली पोलिसांनी ३३ लाख ५० हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
घाटकोपरमधूनही १६ लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या-
मुलुंडमधील एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे प्रकरण ताजे असतानाच, यात घाटकोपरमधून जप्त केलेल्या १६ लाखांच्या जुन्या नोटांची भर पडली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
श्रीधर केदारी बागल(२७), गजानन दगडू खताळ (२८), विजेंद्र सुरेश सोनावणे (३३), दिलीप मेघजी भानुशाली (४८) अशी अटक आरोपींची नावे आहे. बुधवारी रात्री उशिराने काही जण कारमधून जुन्या नोटा बदली करण्यासाठी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, घाटकोपर पोलिसांनी सापळा रचला. याठिकाणी संशयास्पद उभ्या असलेल्या कारमधून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत चलनातून रद्द केलेल्या ५०० रुपये किमतीच्या नोटांतून १६ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.