जुन्या नोटांनी तिकीट, पास काढण्याचा आज शेवटचा दिवस
By admin | Published: November 14, 2016 04:59 AM2016-11-14T04:59:38+5:302016-11-14T04:59:38+5:30
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांद्वारे रेल्वे, मेट्रोसह एसटीत तिकीट आणि पास काढण्याचाही आज शेवटचा दिवस आहे.
मुंबई : पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांद्वारे रेल्वे, मेट्रोसह एसटीत तिकीट आणि पास काढण्याचाही आज शेवटचा दिवस आहे.
९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. मात्र या नोटा सार्वजनिक वाहतुकीत वापरण्याची मुभा देण्यात आल्याने रेल्वे स्थानकांमध्ये मेल-एक्स्प्रेसची फर्स्ट आणि सेकंड क्लास एसीची वेटिंग लिस्टची तिकिटे काढण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली. त्याचप्रमाणे मुंबईतील लोकल सेवांमधील पासही मोठ्या प्रमाणात काढण्यात आले. लांब पल्ल्याची वेटिंग लिस्टची तिकिटे काढण्याचे प्रमाण बरेच वाढल्याचे लक्षात येताच त्याला चाप लावत १० हजार आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांचा परतावा प्रवाशांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णयही घेतला. तरीही प्रवाशांकडून लोकलचे पास आणि प्रतीक्षा यादीची तिकिटे काढण्याचे प्रमाण कमी झालेले नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
या नोटा वापरण्याची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत असल्याने लांब पल्ल्याची तिकिटे काढण्यासाठी स्थानकांत आणखी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या सर्व गोंधळात रेल्वेकडे सुट्या पैशांचा तुटवडा जाणवू लागला आहे. हीच परिस्थिती एसटीतही दिसून येत आहे. एसटीलाही आर्थिक फटका बसला असून, ऐन दिवाळीत भारमानही घसरले. १४ नोव्हेंबरपर्यंत ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय महामंडळानेही घेतला असून, त्याबाबतचे निर्देश सर्व वाहक तसेच तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहकांकडे सुटे पैसेही मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय मुंबई मेट्रोकडून घेतला गेला; मात्र त्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे जाताच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे सोमवारी मेट्रो स्थानकांतही एकच गर्दी होऊ शकते. (प्रतिनिधी)
वाहतूकदारांच्या कर भरणासाठी मुदत
सर्व वाहतूकदारांच्या कर भरणा विषयीच्या सुविधेसाठी परिवहन विभागाची सर्व कार्यालये १४ नोव्हेंबर रोजी कार्यरत राहतील, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. थकीत तसेच चालू कालावधीचा कर भरणा ५00 आणि १000 रुपयांच्या चलनातील जुन्या नोटांद्वारेदेखील केला जाऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे सीमा तपासणी नाके, वायुवेग पथकाकडून वाहनाचा देय कर व दंड सोमवारी रात्री १२पर्यंत भरण्यास सांगण्यात आले आहे.
रिक्षा, टॅक्सींकडून नकार
रेल्वे, मेट्रो, एसटी आणि खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांनी दिलेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र रिक्षा, टॅक्सी चालकांकडून जुन्या नोटा नाकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जुन्या नोटा नको किंवा सुट्टे असतील तरच रिक्षा, टॅक्सीत बसण्यास चालकांकडून सांगितले जात आहे.
खासगी बस सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर
जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे खासगी बस सेवा आणि विशेषकरून पर्यटन बस सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. सध्या मुंबई महानगर परिवहन क्षेत्रात ६ हजारपेक्षा जास्त बसेस असून, या बसेस महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणीही धावतात. यातील प्रत्येक बससाठी टोल, डिझेल आणि चालकाला प्रवासातील रोजचा खर्च हा २५ हजार रुपयांपेक्षा जास्त येतो. मात्र आता सुट्ट्या पैशांची चणचण आणि नव्या नोटाही मिळणे कठीण झाल्याने खासगी प्रवासी वाहतूक आणि पर्यटन सेवेवर मोठा परिणाम होत असल्याची माहिती मुंबई बस मालक महासंघाचे अध्यक्ष के. व्ही. शेट्टी यांनी दिली.