जुनाट पदव्यांचे कागद यापुढे फाडून फेकावे लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:57 PM2021-04-25T23:57:38+5:302021-04-25T23:57:49+5:30
पासपोर्ट, वाहनचालक परवाना अशा दस्तावेजांचे जर आपण नूतनीकरण करतो, तर कधीकाळी घेतलेल्या पदवीला नव्या जमान्याचा वारा का दाखवू नये?
डॉ. दीपक शिकारपूर
कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर कल्पनातीत असा परिणाम झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल होत आहेत. कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे आणि तो वाढत जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवली.
तांत्रिक विषयांसोबतच इतरही सर्वच विद्याशाखांच्या अभ्यासकांना आयटीने विविध प्रकारे साहाय्य केले. ह्याखेरीज इलेक्ट्रॉनिक संवादमाध्यमे वापरून शाळा-कॉलेजांतून दिल्या जाणाऱ्या पारंपरिक शिक्षणातही बदल घडले आहेत व दूरशिक्षणासारखे मार्ग प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहेत. शिक्षणक्षेत्रात आयटीचा इतका खोलवर शिरकाव झाल्याने विद्यार्थ्यांना करावी लागणारी अनुत्पादक पायपीट आणि खर्चात मोठी बचत झाली आहे ... कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन व ह्या तिघांचे जमलेले त्रिकूट ह्यांसारख्या घटकांमुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला!
‘करिअर’ हा शब्द आजच्या तरुणांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा! ह्याचे ढोबळमानाने भाषांतर ‘उपजीविकेसाठी केलेले काम किंवा व्यवसाय’ असे होत असले तरी एखाद्याच्या एकंदर जीवनशैलीच्या आणि मुख्य म्हणजे जीवनपद्धतीच्या संदर्भात करिअर ह्या शब्दाचे नव्हे तर संकल्पनेचे वजन निश्चितच जास्त भरते.
‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग’ म्हणजेच ‘बदल हीच सर्वांत पायाभूत बाब आहे’ संगणकीय विश्व खरे तर इतक्या झपाट्याने बदलत आले आहे की, जुने तंत्रज्ञान किंवा पद्धती कालबाह्य होण्याचा वेग (ह्याला ‘रोलओव्हर पीरिअड’ असे नाव आहे) इथे सर्वाधिक आहे. काही बाबतीत तर अक्षरशः गेल्या महिन्यातल्या प्रणालीची जागा ह्या महिन्यात हाती आलेले नवतंत्रज्ञान घेते आहे. अशा परिस्थितीत उद्योगाला सुसंगत अभ्यासक्रम विकसित करणे, तो शिकवणे हे अतिशय अवघड काम आजच्या शिक्षण पद्धतीला करावे लागत आहे.
अचूक मूल्यमापन करून व परीक्षा घेऊन गुण (क्रेडिट पॉइंट्स) देऊन मग ग्रेड व अखेरीस पदवी प्राप्त होते. ती त्यावेळच्या कामगिरीवर अवलंबून असते. इथे कळीचा मुद्दा हा की, ते ज्ञान जर सतत बदलणार असेल तर सतत विद्यार्थी असणे क्रमप्राप्त आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यावसायिकांना सतत नवीन गोष्टी शिकून प्रमाणपत्रे मिळवावी लागतात तरच नोकरी टिकते.
हल्ली स्पेशलायझेशनचे युग आहे. नुसती पदवी घेऊन भागत नाही. पदवीचा उपयोग जर फक्त पहिल्या नोकरीसाठी असेल तर तिलाही काळानुसार बदलून तिचे नूतनीकरण करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. पासपोर्ट, वाहन असे दस्तावेज जर आपण नूतनीकरण करतो मग पदवीचे पण तसेच का नाही? डिजिटल कार्यपद्धतीमध्ये ते करणे सहज शक्य आहे. जर व्यावसायिकाने प्रमाणित कौशल्ये प्राप्त केली व उद्योगाने ते पुराव्यासह प्रमाणित केले, तर आपोआप नूतनीकरणाचा पर्याय पण विकसित होऊ शकतो. दर पाच वर्षांनी जर परीक्षा, मूल्यमापन ह्या घटकांवर आधारित पूर्वी मिळालेल्या पदवीच्या नूतनीकरणाची पद्धत महाविद्यालये विद्यापीठे राबवू शकतात. त्यामुळे अनुभवी माजी विद्यार्थ्यांचा शिक्षण संकुलांशी संबंध दृढ होतील व त्याचा फायदा आता शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.
औषधे कालबाह्य होतात तशी पदवीसुद्धा होऊ शकते. जर एखाद्या विद्यार्थ्याने क्षेत्र बदलले असेल तर त्याला नवीन क्षेत्रातील बदलांप्रमाणे त्या क्षेत्रातील पदविका मिळण्याची पद्धत पण सुरू होऊ शकते. इथेच ‘प्लस प्लस प्रक्रिया’ आपण राबवू शकतो. पदवी प्लस पदविका असे दुहेरी नूतनीकरण इथे होऊ शकते. गेल्या वीसेक वर्षांत अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडले, सुरुवातीला ते पचवणे अवघड गेले, पण नंतर ते स्वीकारले गेले.
संगणकीय प्रणालींच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रवेशामुळे येत्या फक्त १० वर्षांत जगाचे व्यवहार बदलणार आहेत. डिजिटल शिक्षण हे अनेकांना २०१९ पर्यंत अशक्य वाटत होते ते आता २०२१ मध्ये शक्य झाले. काही क्षेत्रात प्रयोग करून, मग नंतर सरसकट पदवीच्या नूतनीकरणाची प्रक्रिया आपण राबवू शकतो. इतर देशांना एक धडा देऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग करणारा एक अग्रेसर देश म्हणून भारताची ओळख जगात झाली आहे. तेच उच्च शिक्षणाच्या बाबतीत पण घडू शकते. गरज आहे ती इच्छाशक्तीची.
deepak@deepakshikarpur.com