जुन्या वादातून कु-हाडीने वार, एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 04:53 PM2016-10-31T16:53:27+5:302016-10-31T16:53:27+5:30
जुन्या वादाच्या कारणावरून एकाचा कु-हाडीने खून झाल्याची घटना तालुक्यातील उकळी बु. येथे दिवाळीच्या दिवशी घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 31 - जुन्या वादाच्या कारणावरून एकाचा कु-हाडीने खून झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील उकळी बु. येथे दिवाळीच्या दिवशी घडली.
संग्रामपूर तालुक्यातील उकळी बु. येथील कैलास काशीराम गव्हाळे (वय ४१) हे दिवाळीच्या दिवशी बक-या चारून घरी येत असताना दुपारी ४.३० वाजताचे सुमारास गावातीलच इम्रान लतीफ पटेल (वय २२) याने कैलास गव्हाळे यांना पोलीस स्टेशनला रिपोर्ट का दिला? असे म्हणत कु-हाडीने डोक्यावर, मानेवर घाव घातले. जखमी अवस्थेत गव्हाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी घाव घेतली व कैलास गव्हाळे यास तात्काळ तेल्हारा येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. गंभीर जखमी असलेल्या कैलास गव्हाळे यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची मृतकचा भाऊ संतोष काशिराम गव्हाळे याने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी आरोपी इम्रान लतीफ पटेल याचेविरूध्द कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध तामगाव पोलीस घेत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके, जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक साळुंके, सोनाळा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मृतक कैलास गव्हाळे आणि आरोपी इम्रान लतीफ पटेल या दोघांमध्ये जूने वाद असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असून जुन्या वादातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.