विक्रोळीत भरधाव कारने धडक देणारा वृद्ध गजाआड
By Admin | Published: October 4, 2016 12:52 PM2016-10-04T12:52:32+5:302016-10-04T12:52:32+5:30
विक्रोळीतील कन्नमवार नगर २ परिसरात ६० वर्षीय वृद्धाच्या गाडीने ७ जणांना जखमी केले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - विक्रोळी कन्नमवार नगर २ परिसरात ६० वर्षीय वृद्धाच्या गाडीने सात जणांना जखमी केले. जखमींवर महात्मा ज्योतीराव फुले, राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कन्नमवार नगरात राहणारे चालक शब्बीर सय्यद अली (६०) हे नातेवाईक इफ्तार अन्सारी यांच्यासोबत सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कारने (एम.एच. ०२ बी.डी. ०४८३) जात होते. येथील स्वयंभू गणेश मंदीर मार्गावरून जात असताना अली यांचा कारच्या वेगावरील ताबा सुटला. आणि गाडी रस्त्यावरून चाललेल्या सायकलस्वाराला धडक देत ईमारत क्रमांक १७७ समोर उभ्या असलेल्या वडापावच्या गाडीला धडक दिली. अपघातात कार चालक अली यांच्यास ह सोबत असलेले अन्सारी, लक्ष्मण चंदू खोपडेकर, नारायण गोरख गायकवाड, वैष्णवी आदिनाथ पतंगे, शशिकांत नलावडे, सुरेंद्र गुप्ता, आणि ज्ञानोबा सासुरकर हे जखमी झाले. यातील डोक्याला दुखापत झालेल्या जखमी गायकवाड यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जखमी नलावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक अली विरोधात निष्काळजीपणे भरधाव वेगाने कार चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अली यांना बेडया ठोकल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे विक््रोळी पोलिसांनी सांगितले.