मालाडमध्ये वृद्धेला टँकरने चिरडले; टँकरचालक अटकेत
By admin | Published: January 16, 2017 06:09 AM2017-01-16T06:09:13+5:302017-01-16T06:09:13+5:30
मालाडमध्ये सध्या रविवारचे आकर्षण ठरलेल्या ‘मालाड मस्ती’ हा स्ट्रीट प्ले पाहण्याचा मोह एका आजीच्या जिवावर बेतला.
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- मालाडमध्ये सध्या रविवारचे आकर्षण ठरलेल्या ‘मालाड मस्ती’ हा स्ट्रीट प्ले पाहण्याचा मोह एका आजीच्या जिवावर बेतला. लिंक रोडवर एका पाण्याच्या टँकरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. स्नेहल कर्णिक (७४) असे या आजीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे मालाड फ्लायओव्हरकडे असलेल्या अकमी टॉवरमध्ये त्या मुलगा, सून आणि नातवंडांसोबत राहत होत्या. मालाडमध्ये गेल्या महिनाभरापासून दर रविवारी एमडीपी रोड येथे ‘मालाड मस्ती’ या ‘स्ट्रीट प्ले’चे आयोजन करण्यात येत आहे. ेप्रत्येक रविवारी येथे मोठी गर्दी होते. १५ जानेवारी रोजी या ‘स्ट्रीट प्ले’ची सांगता होणार होती. त्यामुळे तो पाहण्यासाठी त्या सून, मुलगा आणि नातवासोबत निघाल्या. मालाडच्या लिंक रोडवर असलेल्या इन्फिनिटी मॉलसमोर रस्ता ओलांडताना एक पाण्याचा टँकर गोरेगावच्या दिशेने निघाला होता, हा टँकर पाहून त्या गोंधळल्या आणि अचानक टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्या. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भोलानाथ यादव (५०) नावाच्या टँकरचालकाला अटक केली आहे.असे बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)