जुन्या पॅकिंगच्या वस्तू ३० सप्टेंबरपर्यंत विका
By admin | Published: July 10, 2017 02:27 AM2017-07-10T02:27:42+5:302017-07-10T02:27:42+5:30
देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्याने जुलै महिन्यानंतर काही आवेष्टित (पॅकिंग) वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात वस्तू व सेवा कर लागू झाल्याने जुलै महिन्यानंतर काही आवेष्टित (पॅकिंग) वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसे असेल तर उत्पादकांना नव्या वाढीव किमतीचे स्टीकर किंवा स्टॅपिंग किंवा आॅनलाइन छपाई केलेले उत्पादन केवळ ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतच विक्री करता येणार आहेत. शिवाय १ जुलै किंवा त्यानंतरच्या वस्तूवर अतिरिक्त स्टीकर लावता येणार नसल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाने केवळ जुलै महिन्यापूर्वी शिल्लक असलेल्या किंवा विक्री न झालेल्या वस्तूंना ही सूट दिली असल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, जुलै महिन्यापूर्वी विक्रीस आलेल्या वस्तूंवर अतिरिक्त स्टीकर लावण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र ती केवळ ३० सप्टेंबरपर्यंतच मर्यादित आहे.
त्यातही विक्रेत्यांना दोन्ही एमआरपी स्पष्ट दिसतील, अशा प्रकारे छापायच्या आहेत. जेणेकरून जितका टक्के कर लागला आहे, तितकीच किंमत वाढली आहे का? याची तपासणी ग्राहकाला करता येईल. शिवाय सुधारित किमतीइतकीच देयकाची रक्कम (बिल) असावी. त्याहून अधिक रक्कम आकारणाऱ्या उत्पादक किंवा विक्रेत्याविरोधात ग्राहकांना तक्रार करता येणार आहे.
...तर येथे करा तक्रार
कोणत्याही उत्पादनावर उत्पादित महिना जुलै किंवा त्यानंतरचा असेल, तर त्यावर दोन एमआरपी असता कामा नये. कारण केंद्र शासनाने दिलेली सूट ही फक्त जुलै महिन्याआधी शिल्लक वस्तूंवर आहे.
त्यामुळे ग्राहकांनी वस्तू घेताना त्यावर आकारलेला कर आणि आधीची रक्कम याची बेरीज करून सुधारित रक्कम तपासावी. जर विक्रेता किंवा उत्पादकाकडून फसवणूक होत असेल, तर वैध मापन शास्त्र कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडे ०२२-२२६२२०२२ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.