जुन्या पुणे-नाशिक महामार्गासाठी ३ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:46 PM2018-03-29T14:46:06+5:302018-03-29T14:46:06+5:30
जुन्या पुणे-नासिक महामार्गावरील मुटकेवाडी ते मार्केडयार्डजवळील अष्टविनायक नगरी या अंदाजे दोन किलोमीटर अंतरासाठी शासनाने ३ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहेत.
चाकण : चाकण शहरातून जाणारा जुना पुणे-नाशिक महामार्ग आता राज्य महामार्गाकडे वर्ग करण्यात आला असून मुटकेवाडी ते अष्टविनायक नगरी या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे एप्रिल महिन्यात हटविण्यात येणार असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.
जुन्या पुणे-नासिक महामार्गावरील मुटकेवाडी ते मार्केडयार्डजवळील अष्टविनायक नगरी या अंदाजे दोन किलोमीटर अंतरासाठी शासनाने ३ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहेत. हा रस्ता मध्यापासून दोन्ही बजावला ४-४ मीटर व त्यांनतर दोन्ही बाजूला दीड-दीड मीटरचा फुटपाथ करण्यात येणार असून रस्त्याच्या मध्यभागी लहान दुभाजक टाकण्यात येणार आहेत. ३१ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी या कामासाठी अंतिम मंजुरी देणार असून एप्रिल महिन्यात या रस्त्यावर करण्यात आलेली कच्ची पक्की बांधकामे, पत्रा शेड, टपऱ्या, ओटे, दुकानांचे नाम फलक, कठडे, हातगाड्या आदी अतिक्रमणे चाकण नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व चाकण पोलीस स्टेशन हे संयुक्तिक रित्या कारवाई करून काढणार आहेत. प्रथमतः सर्वांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी कळविण्यात येणार आहे. तसेच बीएसएनएल व महावितरण कंपनीला रस्त्यात अडथळा करणारे खांब काढण्यासाठीही सूचना देण्यात येणार आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला भूमी अंतर्गत सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. माणिक चौक ते गाडगीळ हॉस्पिटल जवळील ओढा, महात्मा फुले चौकात रुपसागर ते सिकीलकर हॉस्पिटल, सिकीलकर हॉस्पिटल ते बँक ऑफ इंडिया समोरील देशमुख आळी जवळील ओढा, महात्मा फुके चौक ते आगरवाडी रोड दफन भूमी पर्यंत ड्रेनेज लाईन करण्यात येणार आहे.