मंगळवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल ५ तास वाहतुकीसाठी राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 01:27 PM2017-09-16T13:27:13+5:302017-09-16T13:28:19+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे.
- धीरज परब
मीरारोड/ठाणे, दि. 16- मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसावे पूल हा मंगळवार १९ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी सकाळी ५ तास बंद ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूची वाहतूक नविन पुलावरुन होणार असली तरी वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने नागरिकांनी या मार्गावरुन वाहनप्रवास टाळावा असे आवाहन महामार्ग प्राधिकरण व वाहतुक पोलिसांनी केले आहे. मुंबईला जोडणारा वसई खाडीवरील जुना वरसावे पूल हा गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गर्डरला तडा गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कुठल्या पध्दतीने त्याची दुरुस्ती करायची यावर मोठा काथ्याकुट झाल्यावर अखेर उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेम (ट्रस ) चा आधार देऊन दुरुस्ती करण्यात आली. पूल बंद असल्याचा काळात नविन पुलावरुनच दोन्ही बाजुची वाहतुक सुरु होती. परंतु या मुळे काही तास वाहतुक कोंडीत लोकांना घालवावे लागत होते. ९ महिन्यांपासून बंद असलेला हा पूल अखेर मे मध्ये सुरु करण्यात आला.
सध्या जुना पुलावरुन एका मार्गिकेतुन लहान तर एका मार्गिकेतुन मोठी वाहनं सोडली जात आहेत. तसे असले तरी पुलाची नियमीत तपासणी करणे गरजेचे बनले आहे. कारण महाड पूल दुर्घटने नंतर शासकीय यंत्रणा कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. शिवाय जुन्या पुलावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. नियमीत तपासणी मध्ये पुलाची वजन झेलण्याची क्षमता, तडा गेलेल्या गर्डरची स्थिती दुरुस्ती केलेल्या ट्रसची तपासणी केली जाणार असल्याचे प्राधिकरणाच्या सुत्रांनी सांगीतले. अशा प्रकारची तपासणी ही दर तीन ते चार महिन्यांनी केली जाणार आहे.
मंगळवारीदेखील सकाळी ८ वाजल्यापासून तपासणीसाठी जुना पूल वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे. सदर तपासणीचे काम सुमारे ५ तास चालणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुक नविन पुलावरुन वळवली जाणार आहे. जेणे करुन वाहतुकीची मोठी कोंडी होणार असल्याने पोलिस व वाहतुक पोलिसांसह प्राधिकरणदेखील तयारीला लागले आहे.वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतुक शाखेचे १८ ; पालघर शाखेचे २२ तर महामार्ग वाहतुक शाखेचे ११ असे मिळुन ५१ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहे. शिवाय पालिकेच्य वतीने ट्रॅफिक वॉर्डन सुध्दा दिले जाणार आहेत.
अवजड व मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळविण्याचे सांगण्यात आले आहे. दर वीस मिनीटांनी नविन पुलावरुन एका एका बाजुची वाहनं सोडली जाणार आहेत.
जगदिश शिंदे, निरीक्षक, वाहतूक पोलीस