"उमेदवारीसाठी मनसेत मोजावे लागतात पैसे"; हर्षवर्धन जाधवांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 12:53 PM2020-02-10T12:53:23+5:302020-02-10T12:56:32+5:30
शिवसेना समर्थकांकडून सोशल मिडियावरून जाधवांना उत्तर देण्यात आले असून, जाधवांनी मनसे सोडतांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप व्हायरल केली जात आहे.
मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आधी मनसे त्यांनतर शिवसेना आणि आता पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं जाधव म्हणाले आहे. मात्र मनसे सोडताना जाधवांनी पक्षावर केलेल्या आरोपाचा व्हिडिओ शिवसेना समर्थकांकडून सोशल मिडियावर व्हायरल केला जात आहे. ज्यात उमेदवारीसाठी मनसेत पैसे मोजावे लागतात असा आरोप जाधव करताना पाहायला मिळत आहे.
जाधव यांनी मनसेत प्रवेश करताच आपले कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीत त्यांनी वर्तवलं होते. त्यामुळे शिवसेना समर्थकांकडून सोशल मिडियावरून जाधवांना उत्तर देण्यात आले असून, जाधवांनी मनसे सोडतांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप व्हायरल केली जात आहे.
यात जाधव म्हणतात की, मनसेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळता येत नाही. काही तरी नवीन करता येईल म्हणून मी मनसेत आलो होतो. मात्र मनसेत सुद्धा सर्व मिलीभगत असल्याचे पाहायला मिळाले. तर विधानसभा निवडणुकीत पैश्यांची देवाणघेवाण झाली. तर मला मारहाण करणाऱ्या पक्षातील लोकांना पद देण्याचे काम मनसेने केलं. तर ही सर्व पदे अर्थकारणाशिवाय केलं का, असा माझा प्रश्न असल्याचे सुद्धा जाधव म्हणाले होते.
हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावरच 2009 मध्ये आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास त्यांचा राहिला आहे. तर लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांना या निवडणुकीत विजय मिळवता आला नाही, मात्र चंद्रकांत खैरेंच्या पराभवाचे ते कारण ठरले होते. आता त्यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हातात घेतला असल्याने औरंगाबादच्या राजकरणात पुन्हा जाधव विरुद्ध खैरे असा वाद पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.