उल्हासनगरात चोरीसाठी वृद्धेचा खून, एकाला अटक
By admin | Published: July 20, 2016 07:48 PM2016-07-20T19:48:44+5:302016-07-20T19:48:44+5:30
उल्हासनगर येथील एका वृद्धेकडे चोरी करण्यासाठी तिचा गळा दाबून निर्घृण खून करणाऱ्या सुनिल सुदाम कनोजे (३८) याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 20 - उल्हासनगर येथील एका वृद्धेकडे चोरी करण्यासाठी तिचा गळा दाबून निर्घृण खून करणाऱ्या सुनिल सुदाम कनोजे (३८) याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून त्या वृद्धेकडून हिसकावलेल्या दोन सोन्याच्या बांगडयाही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
उल्हासनगर रेल्वे स्थानक रोडवरील ढोली नाश्तावाला या हॉटेलसमोरील एकटयाच राहणाऱ्या वीणा रामनानी (६३) यांच्याकडे पाणी मागण्याच्या बहाण्याने सुनिल या फिरस्त्याने ४ जुलै रोजी शिरकाव केला होता. त्यानंतर त्यांचे दागिने हिसकावण्यासाठी त्याने हत्या केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे खंडणी विरोधी पथक, मध्यवर्ती शोध पथक तसेच युनिट चारचे उल्हासनगर अशा तीन पथकांसह उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथकही या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. मणेरे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार, मुकूंद हतोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही धागादोरा नसतांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युनिट चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, अजय कांबळे आदींच्या पथकाने १६ दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला. पूर्वी वीणा यांच्या मुलाच्या अगरबत्तीच्या दुकानात सुनिल हा नोकरीला होता. तो गेल्या काही दिवसांपासून त्या परिसरातून अचानक बेपत्ता असल्याचीही माहितीही या पथकाला मिळाली. त्यानुसार उल्हासनगर, कल्याण ते पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक, पुणे आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान, तो उल्हासनगर येथील अशोक टॉकीज परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २० जुलै रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन तोळयाच्या सोन्याच्या दोन बांगडयाही हस्तगत करण्यात आल्या आहेत. जबरी चोरीच्या उद्देशानेच या वृद्धेची हत्या केल्याची कबूलीही त्याने पोलिसांना दिली. वृद्धेचा खून केल्यानंतर तिच्या हातातून या सोन्याच्या बांगडया काढून घेतल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्याला शोधण्यासाठी अनेक रेल्वे तसेच बस स्थानके, चित्रपटगृह, दारुचे गुत्ते धर्मशाळेत रात्रीच्या वेळी राहणाऱ्या लोकांकडे अशा अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला होता. त्याने आणखी काही प्रकार केले आहेत का? याचाही शोध घेण्यात येत असल्याचे मणेरे यांनी सांगितले.