महाराष्ट्रातील वृद्ध देशात सर्वाधिक असुरक्षित
By Admin | Published: August 19, 2015 01:36 AM2015-08-19T01:36:38+5:302015-08-19T01:36:38+5:30
महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे
जयेश शिरसाट, मुंबई
महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुली, महिलांचा विनयभंग, छेडछाडीतही महाराष्ट्र अव्वल असल्याचा निष्कर्षही समोर आला आहे.
एनसीआरबीने २०१४ मध्ये देशभरात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण गुन्हेगारीत मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पिछाडीवर असला तरी वृद्ध आणि महिलांविरोधी अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे.
संपूर्ण राज्यात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण १८७१४ गुन्हे दाखल झाले. त्यात १९००८ वृद्ध पीडित आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ३९४८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. त्याखालोखाल मध्यप्रदेश (३४३८), तामिळनाडू(२१२१), राजस्थान(१०३४) अशी राज्ये आहेत.
आकडेवारीतली सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांवरील सर्वाधिक बलात्कार महाराष्ट्रात घडलेत. वृद्धांचे घर लक्ष्य करत दरोडे घालण्यातही महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. असे २४ दरोडे राज्यात पडलेत. तर संपूर्ण देशात ही संख्या ४० आहे.
महिलांविरोधी अत्याचाराचे एकूण ३ लाख ३७ हजार ९२२ गुन्हे दाखल झाले. त्यात ३ लाख ४१ हजार महिला पीडित ठरल्या. महिलांविरोधी एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे.