बापरे! पोलिस भरतीसाठी एवढे जण रांगेत; १२ लाख उमेदवारांनी केले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:40 AM2022-12-12T05:40:32+5:302022-12-12T05:40:46+5:30
पोलिस भरतीसाठी ९ नोव्हेंबर २०२२ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात १८ हजारांपेक्षा अधिक पोलिस शिपाई भरतीसाठी आतापर्यंत ११.८० लाख अर्ज आले असून, अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशांनाही दिलासा मिळाला आहे.
पोलिस भरतीसाठी ९ नोव्हेंबर २०२२ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत वाढवून १५ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने ट्वीट करून दिली. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवारांची कागदपत्रे अडकली होती किंवा वेळेवर मिळाली नव्हती, अशा उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे, तर ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशांनाही दिलासा मिळाला आहे.
मुख्यालयाने जारी केली रिक्त पदांची यादी
राज्य पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलिस दलात सहा हजार ७४० पदांसह राज्यात १४ हजार ९५६ पोलिस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे.
११.८० लाख अर्ज
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत दिलेल्या माहितीत आतापर्यंत ११.८० लाख अर्ज आले आहेत. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जाची संख्या वाढत आहे.