ओमी टीमचा भाजपाला ऐनवेळी धोबीपछाड?
By admin | Published: April 3, 2017 04:13 AM2017-04-03T04:13:27+5:302017-04-03T04:13:27+5:30
महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले
उल्हासनगर : आधी महापौरपदाचे आश्वासन देऊन नंतर ते फिरवल्याने भाजपा आणि ओमी कलानी टीममध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने वेगळे वळण घेतले असून त्याचे पडसाद बुधवारच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. पंचम यांच्यासह ओमी टीमच्या नाराज २१ नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा देण्याचे ठरवल्याने भाजपाची स्थिती कमकुवत बनली आहे. शिवसेनेने या असंतुष्टांभोवती गळ टाकल्याने हातातोंडाशी आणलेली सत्ता जाते की काय भीतीने भाजपा नेत्यांच्या पोटात गोळा आला आहे.
ओमी यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवून मीना आयलानी यांना महापौरपदाची संधी दिल्याने भाजपातील एक गट बिथरला आहे. त्यामुळे पंचम यांच्यासह ओमी गटाचे नगरसेवक महापौर निवडणुकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबत ओमी कालानी व मनोज लासी यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. भाजपाच्या ३३ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवक आमच्या गटाचे असल्याचा दावा ओमी सुरूवातीपासून करत आहेत. भाजपाने साई पक्षाला सोबत घेतले. पण त्या पक्षालाही फुटीचे ग्रहण लागले असून त्यांच्या ११ नगरसेवकांपैकी सहा जण फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा शिवसेना नेते करत आहेत. साई गटाची मान्यता रद्द झाल्याने त्यांना कोणताही व्हिप लागू होणार नाही. आधीच त्यांच्यातील फूट आणि ओमी गटाची ओढवून घेतलेली नाराजी यामुळे निष्ठावंत म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. (प्रतिनिधी)