Omicron : चिंता कायम, राज्यात ८५ ओमायक्रॉनबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 07:28 AM2021-12-30T07:28:23+5:302021-12-30T07:28:43+5:30
Omicron: एनआयव्हीने रिपोर्ट केले ४७ रुग्णांत ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई : राज्यात ८५ ओमायक्रॉनबाधित रुग्णांचे निदान झाले. यापैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही), तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) रिपोर्ट केले. एनआयव्हीने रिपोर्ट केले ४७ रुग्णांत ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
बुधवारी आढळलेल्या ८५ ओमायक्रॉन बाधितांत मुंबई -३४, नागपूर व पिंपरी चिंचवड - प्रत्येकी ३, नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी २, पनवेल, कोल्हापूर आणि बुलडाणा – प्रत्येकी १ रुग्ण आहेत, तर आयसरने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले. यात मुंबई -१९, कल्याण डोंबिवली - ५, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड - प्रत्येकी ३, वसई विरार आणि पुणे मनपा - प्रत्येकी २, पुणे ग्रा., भिवंडी निजामपूर, पनवेल, ठाणे मनपा - प्रत्येकी १ या रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ९९ रुग्णांना त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे.
१७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.