Omicron: ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:31 AM2021-12-07T05:31:32+5:302021-12-07T05:32:07+5:30
ओमायक्रॉन विषाणूविषयी अजूनही अधिक शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती समोर यायची आहे, सर्व पातळ्यांवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.
मुंबई : राज्यात आता ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने वाढतोय का, त्याची गती किती आहे, यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सच्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन लाटेच्या परीक्षणासाठी आणखी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी, आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहिमेची गती वाढविली जाणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, आता ओमायक्रॉनच्या सर्तकतेसह लसीकरणावर अधिक लक्ष देण्यात येईल. शिवाय, कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन होतेय का, याची पडताळणी करण्यात येईल. मागील काही दिवसांत संसर्ग नियंत्रणात आल्याने मास्कच्या वापराविषयी बेफिकिरी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कठोर नियम करण्यात येतील.
ओमायक्रॉन विषाणूविषयी अजूनही अधिक शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती समोर यायची आहे, सर्व पातळ्यांवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. पॅनिक न होता या परिस्थितीत खबरदारी घेतली पाहिजे. दुसऱ्या लाटेत डेल्टामुळे झालेला त्रास पाहता नव्या विषाणूचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, अशी माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी दिली. ओमायक्रॉनच्या रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे, त्यामुळे सुरुवातीला प्रवास करून आलेल्या पर्यटकांवर नजर ठेवून शोध, निदानावर भर दिला पाहिजे, असेही डॉक्टरांनी नमूद केले.
त्रिसूत्री महत्त्वाची
कोरोना विषाणूत झालेल्या जनुकीय बदलाचा शोध घेण्यासाठी किमान एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सुरुवातीला शोध, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीचे पालन आरोग्य यंत्रणांनी केले पाहिजे. जेणेकरून, नव्या विषाणूच्या प्रसाराचा वेग, तीव्रता अभ्यासणे सोपे जाईल. - डॉ. राहुल पंडित, राज्य व राष्ट्रीय कोरोना टास्क फोर्स