चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेसह इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात आलेले 6 जण कोरोना संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 01:04 PM2021-12-01T13:04:40+5:302021-12-01T13:05:50+5:30
CoronaVirus : "कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे."
मुंबई - कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉनने (Coronavirus New Variant Omicron) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारने यापासून संरक्षणासाठी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात परतलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.
Omicron Variant ची पुष्टी नाही -
कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या सहाही लोकांमध्ये अद्यापपर्यंत नव्या व्हेरिअंटची पुष्टी झालेली नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले, की कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. याशिवाय त्यांचे कॉन्टॅक्ट्स ट्रेसिंगही केले जात आहे.
महाराष्ट्रात 678 नवे कोरोना बाधित -
महाराष्ट्रात मंगळवारी 678 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 35 जणांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 66 लाख 35 हजार 658 झाली. तर आतापर्यंत 1 लाख 40 हजार 997 जणांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 942 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 64 लाख 83 हजार 435 वर पोहोचली आहे.