Omicron Variant Maharashtra : राज्यात आठ जणांना ओमायक्राॅनची बाधा; एकूण संख्या ४० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 08:10 AM2021-12-18T08:10:36+5:302021-12-18T08:10:52+5:30
पुण्यात सर्वाधिक सहा रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले.
मुंबई : राज्यात शुक्रवारी आणखी आठ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आल्याने एकूण संख्या ४० वर पोहोचली आहे. पुण्यात सर्वाधिक सहा रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत, तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतून प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या ओमायक्रॉन सर्वेक्षणविषयक माहितीनंतर राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ४० झाली आहे. यात, सर्वाधिक १४ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे ग्रामीणमध्ये ६, तर पुणे मनपा, कल्याण-डोंबिवली, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ आणि बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरार या ठिकाणी प्रत्येकी एक एक रुग्ण आढळला आहे.
शुक्रवारी ओमायक्रॉन बाधित आढळलेले सर्व आठ रुग्ण वय वर्षे २९ ते ४५ या वयोगटातील आहेत. त्यातील ७ रुग्ण लक्षणेविरहित, १ रुग्ण सौम्य स्वरूपाचा आहे. हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार यापैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई प्रवास आणि २ रुग्ण निकट सहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णाचा अमेरिका प्रवास आणि कल्याण-डोंबिवली येथील एका रुग्णाचा नाजेरिया प्रवास झाला आहे. या ८ रुग्णांपैकी २ जण रुग्णालयात तर ६ जण घरीच विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
राज्यात शुक्रवारी ९०२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६६ लाख ४७ हजार ८४० झाली आहे. सध्या राज्यात ६,९०३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दिवसभरात ६८० जणांची रुग्णालयातून सुटका झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६४ लाख ९५ हजार ९२९ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी २९५ जणांना कोरोनाची बाधा झाली. २२७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर, कोरोनामुळे शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.