Omicron Variant In Maharashtra : ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सोमवारी दुबईतून आलेल्या दोघांना बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 06:49 AM2021-12-15T06:49:32+5:302021-12-15T06:49:56+5:30
राजस्थान, दिल्ली व गुजरातमध्येही भीती
नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या अद्याप दोन आकड्यांत असली तरी त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल राजस्थान, दिल्ली व गुजरात या तीन राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने या तीन राज्यांत चिंता व भीती वाढली आहे. दुबईहून सोमवारी महाराष्ट्रात आलेले दोघे ओमायक्राॅनचे रुग्ण निघाले आहेत.
देशात ओमायक्रॉनचे एकूण ४९ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २० एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड भागातच अधिकांश रुग्ण आढले आहेत. दिल्ली व राजस्थानमध्ये गेल्या २४ तासांत ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंत राजस्थानमध्ये ९ तर दिल्लीत ६ रुग्ण आढळले असून, गुजरातमध्ये ही संख्या ४ आहे. कर्नाटकात तीन तसेच केरळ, आंध्र प्रदेश तसेच चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेला एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून केनया, अबुधाबी, दिल्ली या मार्गे गुजरातमध्ये आला. तो ३ डिसेंबर रोजी गुजरातेत आला.