Omicron Variant: वर्षाखेरीस वाढतेय ओमायक्रॉन धास्ती; आणखी ११ रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:38 AM2021-12-22T09:38:45+5:302021-12-22T09:40:02+5:30
उस्मानाबाद येथील रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी ओमायक्रॉन बाधित आढळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात मंगळवारी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी आठ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे.
आजपर्यंत राज्यात एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट आले आहेत. यापैकी ३४ रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात आढळलेल्या ११ ओमायक्रॉन रुग्णांमध्ये मुंबईतील आठ रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळलेले आहेत. यातील प्रत्येकी १ रुग्ण केरळ , गुजरात आणि ठाणे येथील आहे. तर इतर रुग्ण मुंबईतील आहेत. या रुग्णांचा युगांडा मार्गे दुबई – २, इंग्लंड – ४, दुबई -२ असा प्रवासाचा इतिहास आहे. दोन १८ वर्षांखालील मुले वगळता, सर्वांनी लस घेतलेली आहे. सर्व रुग्ण लक्षणेविरहित ते सौम्य या गटातील आहेत. तर केनियावरून हैदराबाद मार्गे आलेला नवी मुंबई येथील एक १९ वर्षीय तरुण ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळले आहे.
राज्यात ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६४,९८,८०७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८२५ रुग्णांचे निदान झाले, १४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात ७,१११ रुग्ण उपचाराधीन आहेत.
ओमायक्रॉनचे ८१ टक्के रुग्ण पूर्ण लसवंत
राज्यातील ५४ ओमायक्रॉन रुग्णांपैकी ८१ टक्के रुग्ण पूर्ण लसवंत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. अशा स्वरूपाचा संसर्गाला ब्रेक थ्रू संसर्ग, असे म्हणतात. म्हणजेच लसीचे दोन्ही डोस होऊनही कोरोनाची बाधा होणे. यापैकी काही रुग्णांनी तर फायझर लसीचा तिसरा डोसही घेतल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत तर अन्य रुग्णांमध्ये कफ, ताप, घशाला खवखव ही लक्षणे दिसली आहेत. मात्र, कोणत्याही रुग्णांमध्ये संसर्गानंतर लक्षणे वाढत गेल्याचे उदाहरण नाही, अशी माहिती आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली.
१३ वर्षांची सहवासित बाधित
उस्मानाबाद येथील पूर्वी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णांची १३ वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणे नाहीत.
प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून आतापर्यंत ५८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
ओमायक्रॉनच्या रुग्णांची राज्यवार संख्या
महाराष्ट्र : ५४, दिल्ली : ५४, तेलंगणा : २०, कर्नाटक : १९, राजस्थान : १८, केरळ : १६, गुजरात : १४, उत्तर प्रदेश : ०२ आणि आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू व प. बंगाल : प्रत्येकी १
देशामध्ये २०० रुग्ण
जगभर दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉनचे रुग्ण देशातही झपाट्याने वाढत चालले आहेत. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या २०० वर गेली. महाराष्ट्र व दिल्ली या दोन राज्यांत सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ५४ रुग्ण आहेत.
विमान कंपन्यांकडून ऑफर्स
ओमायक्राॅनमुळे विमान प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही विमान कंपन्यांकडून आता विविध ऑफर्स सुरू झाल्या आहेत. एका कंपनीने प्रवाशांना माेफत भाेजन आणि तिकीट अशी डबल ऑफर दिली आहे.