Wine: सरकारी कागदावर वाईन हे अल्कोहोलिक पेयच, दारू म्हणण्यास मद्यप्रेमींचा मात्र विरोध

By यदू जोशी | Published: January 30, 2022 08:57 AM2022-01-30T08:57:58+5:302022-01-30T08:59:29+5:30

Wine: वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

On government paper, wine is the only alcoholic beverage, but alcoholics oppose it | Wine: सरकारी कागदावर वाईन हे अल्कोहोलिक पेयच, दारू म्हणण्यास मद्यप्रेमींचा मात्र विरोध

Wine: सरकारी कागदावर वाईन हे अल्कोहोलिक पेयच, दारू म्हणण्यास मद्यप्रेमींचा मात्र विरोध

googlenewsNext

- यदु जोशी
 मुंंबई : वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. वाईनप्रेमी, उत्पादक हे वाईनला दारू म्हणण्याच्या एकदम विरोधात आहेत. राज्य सरकारच्या कायद्यानुसार मात्र  वाईन हे अल्कोहोलिक पेय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकेकाळी, वाईन ही दारू नाही’ असे विधान केलेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी पुण्यात बोलताना वाईन ही दारू नसल्याचे प्रमाणपत्र दिले. राज्यातील अनेक शहरांमध्ये वाईन क्लब आहेत. त्यात अनेक वाईनप्रेमी सदस्य आहेत आणि या क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी वाईनला दारू म्हणण्यास तीव्र विरोध दर्शविला.

सर्वच प्रकारच्या अल्कोहोलिक पेयांना आपल्याकडील सामान्य नागरिक दारू असे म्हणतात. राज्य सरकारच्या बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट १९४९ च्या अंतर्गत अल्कोहोलिक पेय (अल्कोहोलिक बेवरेजेस) म्हणून ज्या पेयांचा उल्लेख केलेला आहे त्यात ब्रीझर, बीअर, वाईन आणि इंडिया मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल), कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा समावेश होतो. यातील आयएमएफएल पेय आणि देशी दारू हे दारू या प्रकारात मोडतात, असे वाईनप्रेमींचे म्हणणे आहे.

वाईनच्या व्यसनाने मृत्यू झाल्याचे उदाहरण दाखवा
अति दारू पिल्याने लोक मेल्याची अनेक उदाहरणे आहेत, पण एखादी व्यक्ती वाईनच्या आहारी जाऊन मरण पावल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष ॲड. रवी निमसे यांनी दिले. द्राक्षाला सरकार किमान आधारभूत किंमत देत नाही; पण सरकारच्या कालच्या निर्णयाने द्राक्ष उत्पादकांना काही तरी आधार मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अल्कोहोलचे प्रमाण किती असते? 
- ब्रीझरमध्ये पाच टक्क्यांपर्यंत, बीअरमध्ये पाच ते 
आठ टक्के, वाईनमध्ये ११ ते १४ टक्के इतके अल्कोहोलचे प्रमाण असते. 
- आयएमएफएलमध्ये ४२.८ टक्क्यांपेक्षा अधिक अल्कोहोल असू नये, असे कायद्यात नमूद आहे.  

किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्याने वाईनची विक्री वाढून त्याचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल. 
- शैलेंद्र पै, व्यवस्थापकीय संचालक, 
वॅलोनी विनियार्ड्स प्रा.लि.  

वाईन ही दारू नाहीच. वाईन बनविण्याची प्रक्रिया ही दारूपेक्षा अगदीच वेगळी आहे. वाईनमध्ये अल्कोहोल हे नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते. आयएमएफएलमध्ये ते मिसळले जाते. सरकारच्या निर्णयाचे निश्चितच स्वागत आहे.
- शरद फडणीस, संस्थापक, नागपूर वाईन क्लब. 

दारूबंदी करायची तर सरकार तिच्या विक्रीची वेगवेगळी माध्यमे शोधत आहे. उत्पन्नवाढीचा हा एकच मार्ग सरकारला दिसत आहे. जनतेचे उत्पन्न आणि उत्पादकता कमी करणारी दारू विकण्यासाठी लोकांच्या खिश्यात हात घालायचा आणि त्याचे दु:ख लोकांच्या कुटुंबांवर ढकलून द्यायचे, अशी ही दुष्ट सरकारी नीती आहे. 
- डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.  

सरकारने हा निर्णय घेताना जनसुनावणी घ्यायला हवी होती. लोकांना वाईनची अशी विक्री हवी होती का? की भांडवलदार कंपन्यांसाठी हा निर्णय झाला. वाईन दारू आहे की नाही, हा भाग सोडा, पण समाज व्यसनी होण्यासाठीचा तो एक टप्पा आहेच. सरकारला महसुलासाठी दारूच का दिसते? व्यसनमुक्त समाज हे सरकारचे ध्येय असले पाहिजे.
- वर्षा विद्या विलास, राज्य सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य. 

अतिरिक्त सेवन  करणे धोक्याचे
वाईनमध्ये मद्याचे प्रमाण ठराविक प्रमाणात असते, त्यामुळे वाईनचे अतिसेवन धोक्याचे आहे. मात्र वाईन बऱ्याचदा पाचक द्रव्य म्हणून वापरतात, त्यामुळे त्याचे सेवन करण्याचेही प्रमाण ठरलेले असते. आपल्याकडे पाहुणे आल्यावर ज्याप्रमाणे आपण चहासाठी विचारतो त्याप्रमाणेपाश्चात्य संस्कृतीत वाईन हे द्रव्य दिले जाते.
- डॉ अविनाश भोंडवे, 
माजी अध्यक्ष, आयएमए

Web Title: On government paper, wine is the only alcoholic beverage, but alcoholics oppose it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.