वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सलॉन -ब्युटी पार्लर सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:40 IST2025-01-01T12:38:51+5:302025-01-01T12:40:27+5:30
सलॉन-ब्युटी पार्लरच्या सेवेत १ जानेवारीपासून वाढ करण्यात आली आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सलॉन -ब्युटी पार्लर सेवेत २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ
नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे, नव्या वर्षांचे सर्वांनीच जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, आज म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून सर्वसामान्यांना झटका बसला आहे. आता सलॉन आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली आहे. आजपासून या सेवेत २० ते २५ टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आजपासून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
दरवाढीचा निर्णय राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतला होता. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात ही दरवाढ होणार आहे. असोएशिएनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी याबाबत माहिती दिली.
१ जानेवारी २०२५ पासून सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे आता आजपासून केस कापणे महागणार आहे. वाढती महागाई, जीएसटी वाढ, सलून मधील वस्तुंचे वाढलेले दर या कारणांमुळे दरवाढ केल्याची माहिती असोएशनने दिली आहे.
LPG सिलिंडर झाला स्वस्त
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून १४ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे.मात्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील ही सवलत फक्त १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आज वर्षाचा पहिला दिवस असून एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १८०४ रुपये, मुंबईत १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये आणि कोलकातामध्ये १९११ रुपये असेल. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना या दर कपातीचा मोठा फायदा होणार आहे.